‘‘महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याने शेतकऱ्यांच्या नावाने आयुष्यभर केवळ राजकारण केले. ते अनेक वर्षे केंद्रात कृषिमंत्री होते. परंतु, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले’’, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत केला. पंतप्रधान मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच शरद पवार यांच्यावर टीका केली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांना प्रश्नांची सरबत्ती केली जात आहे.
आमदार रोहित पवार यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. “पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानंतर अजित पवारांनी बोलायला पाहिजे होतं. मराठी माणूस लगेच प्रत्युत्तर देणारा व्यक्ती आहे. असं वक्तव्य होऊन अजित पवारांसारखे नेते शांत बसत असतील, तर आम्हाला योग्य वाटत नाही,” असं रोहित पवार म्हणाले.
हेही वाचा : “कृषिमंत्री असताना काय केले?” शरद पवारांबद्दल मोदींनी केलेल्या विधानावर शिंदे गटातील मंत्री म्हणाले…
“शेतकऱ्यांना विचारा आजच्या सरकारनं आणि शरद पवार काय केलं? बारामतीत आल्यावर पंतप्रधानांनी म्हटलेलं, ‘शरद पवारांचं कृषी विषयक ज्ञान खूप मोठं आहे. शरद पवारांच्या बोटाला पकडून राजकारण शिकलोय.’ मग, मोदी तेव्हा खोटे बोलत होते की, आता खोटे बोलत आहेत, हे स्पष्ट केलं पाहिजे,” असं रोहित पवारांनी म्हटलं.
हेही वाचा : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली छत्रपतींची शपथ, भास्कर जाधव म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांच्या मनात…”
“आता हिरे व्यापाराचा उद्योगही गुजरातला चालला आहे. त्यामुळे भाजपाचे नेते महाराष्ट्रातील मुलांसाठी काम करतात की गुजरातसाठी,” असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.