Rohit Pawar on Beed Case : गेल्या काही दिवसांपासून बीडमधील राजकारण राज्यभर मध्यवर्ती राहिलं आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही हे प्रकरण लावून धरलं. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड नुकताच पोलिसांच्या स्वाधीन झाला. तो सध्या बीडमधील केजमध्ये सीआयडीच्या कोठडीत आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक एक्स पोस्ट करून खळबळ निर्माण केली आहे.
“बीड पोलीस ठाण्यामध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत”, असं रोहित पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले, “नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी शिवाय गादी-उशी, पंखा, AC देखील बसवता येतील का, याचाही विचार करायला हवा”, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. यामध्ये रोहित पवारांनी कोणाचंही नाव घेतलं नसलं तरीही त्यांचा रोख कोणावर आहे हे स्पष्ट होतंय.
#बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 1, 2025
नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला…
हेही वाचा >> Santosh Deshmukh Brother : संतोष देशमुख यांच्या भावाने घेतली सीआयडी अधिकाऱ्यांची भेट; म्हणाले, “प्रकरणाचा तपास…”
वाल्मिक कराड मंगळवारी पोलिसांना शरण
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड हे मंगळवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले. शरण येण्यापूर्वी त्यांनी स्वतःचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. ज्यामध्ये त्यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले. राजकीय द्वेषापोटी माझ्याविरोधात आरोप केले जात असून जर पोलीस तपासांत मी दोषी आढळलो तर जी शिक्षा होईल, ती भोगण्यासाठी मी तयार असल्याचे ते म्हणाले आहेत.