Rohit Pawar : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला एक दिवस बाकी आहे. मात्र, मतदानाच्या आधी अनेक घटना घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच आज विरारमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. भाजपाचे नेते विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला. यानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून काही व्हिडीओही शेअर करण्यात आले आहेत.
दरम्यान, भाजपाच्या या आरोपानंतर रोहित पवार यांनी फेसबुक लाईव्ह करत भाजपाला प्रत्युत्तर देत हल्लाबोल केला आहे. तसेच ‘माझ्या मतदारसंघात पैसे वाटप करतानाचं पद्धतशीरपणे नाटक रंगवण्यात आलं आहे. माझ्या कार्यकर्त्याला, नातेवाईकांना आणि मला काही झालं तर त्याला प्रशासन जबाबदार असेल’, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : “विनोद तावडे कुठेही दोषी नाहीत, कोणतेही पैसे…”, विरारमधील राड्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
भाजपाचं ट्विट काय?
“दिवसभरात रोहित पवारांच्या मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचं वाटप सुरू आहे. अनेक गावांत बारामती ॲग्रो कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून पैसे वाटप केले जात आहेत. पैशांच्या जोरावर मतदान विकत घेण्याचा प्रयत्न रोहित पवारांच्या मार्फत सुरू आहे. दिवसभरात ही तिसरी घटना उघडकीस आली. कर्जत जामखेड मतदारसंघात कोट्यवधींचं घबाड कुठून आलं? महाविकास आघाडीचे लोक आणि रोहित पवार उत्तर द्या!”, असं भाजपाने ट्विट करत म्हटलं आहे.
रोहित पवारांनी काय म्हटलं?
“उद्या योग्य व्यक्तीला मतदान करा. ज्या ठिकाणी कोणी गुंडा गर्दी करत असेल आणि आपल्याला मत मागत असेल तर संविधानावर विश्वास ठेवा. काही वेळापूर्वी बातमी आली की माझ्या कंपनीच्या एका माणसाकडे रोकड सापडली. खरं तर राजकारण फार पलिकडे गेलेलं आहे. जर सामान्य लोक घाबरून मतदान करणार नसतील तर उद्या चांगले प्रतिनिधी कसे निवडले जाणार आहेत. जी काही रक्कम आहे ती फार छोटी रक्कम आहे. तसेच त्यात बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. पेपरवर काही गोष्टी लिहून घेतलेल्या आहेत. दबावतंत्रामधून असं बरंच काही आहे. त्यामुळे कुठेही दिशाभूल होऊ नये, याची दक्षता सर्वांनी घ्यावी. उद्या माझ्या कार्यकर्त्याला, माझ्या पदाधिकाऱ्याला, माझ्या कुठल्याही नातेवाईकाला मला जर काही झालं तर प्रशासन पूर्णपणे जबाबदार असतील. जर यामध्ये राजकारण असेल तर जे राजकीय लोक असतील ते देखील याला जबाबदार असतील”, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.