धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा आणि कालीचरण महाराजांनी अलीकडेच आक्षेपार्ह विधानं केली आहेत. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी साईबाबांना देव मानण्यास नकार दिला आहे. साईबाबा हे संत होऊ शकतात, ते फकीर होऊ शकतात पण ते देव होऊ शकत नाहीत. गिधाडाचं चामडं पांघरून कुणी सिंह होत नाही, असं विधान धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलं. दुसरीकडे, कालीचरण महाराजांनी महात्मा गांधींच्या हत्येचं समर्थन केलं. नथुराम गोडसे यांनी जे केलं ते योग्यच होतं. नथुराम गोडसे नसते तर हिंदू धर्म बुडाला असता, असं विधान कालीचरण महाराजांनी केलं.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि कालीचरण महाराजांनी केलेल्या वक्तव्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी समाचार घेतला. रोहित पवार यांनी दोघांच्या वक्तव्यांचा निषेध केला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं, “श्री साईबाबा आणि महात्मा गांधी यांच्याबाबत दोन भोंदू बाबांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध करतो. या निमित्ताने महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुका कोणत्या दिशेला नेण्यात येत आहेत, याचा अंदाज येऊ लागलाय.”
रोहित पवार ट्वीटमध्ये पुढे म्हणाले, “भोंदूबाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधींना नष्ट करण्याचे कुणी कितीही प्रयत्न केले तरी ते नष्ट होऊ शकत नाहीत. कारण गांधी हा विचार जगात अजरामर आहे. पण हे विचार संपवण्याचा एका मोठ्या राजकीय पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळं हिंमत असेल तर, भोंदूंच्या आडून ट्रायल घेण्यापेक्षा त्यांनी अधिकृत भूमिका घेण्याचं धाडस दाखवावं.”
“निवडणुका जवळ आल्या की तथाकथित बाबा-बुवा या भोंदू लोकांना पुढं करून वादग्रस्त विधानं करायला लावायची. जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद निर्माण करायचा. नको त्या विषयांवर चर्चा घडवायची. मुख्य प्रश्नांवरून लोकांचं लक्ष दुसरीकडं वळवायचं आणि आपली राजकीय भाकरी भाजायची, हे या पक्षाचं पहिल्यापासूनच धोरण राहिलंय. पण संतांच्या आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकरांसारख्या महापुरुषांच्या महाराष्ट्राला हा डाव समजत नाही, या भ्रमातून या पक्षाने बाहेर यावं. त्यांनी बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आणि बोकाळलेला भ्रष्टाचार याबाबत लोक विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत,” अशी टीका रोहित पवार यांनी केली.