Rohit Pawar on NCP Sharad Pawar : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं. तर महाविकास आघाडीला मोठं अपयश मिळालं. महायुतीला मिळालेल्या यशानंतर आता राज्यात महायुतीचं सरकार स्थापनेच्या हालाचाली सुरु आहेत. मात्र, निवडणुकीचा निकाल लागून आठवडा झाला तरीही अद्याप सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. सरकार स्थापनेसाठी महायुतीच्या नेत्यांच्या बैठका सुरु आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची दिल्लीत अमित शाह यांच्याबरोबर महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीच्या सरकारबाबत चर्चा झाल्याचं बोललं जातं. मात्र, अद्याप मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत सस्पेंस कायम आहे.
दरम्यान, दुसरीकडे विरोधी पक्षाला मिळालेल्या अपयशानंतर पराभवाची कारणं आता नेत्यांकडून शोधण्यात येत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला विधानसभेत आलेल्या अपयशानंतर आता पक्ष संघटनेत मोठे बदल करण्यात येण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार रोहित पवार यांनी देखील मोठं भाष्य केलं आहे. “शंभर टक्के पक्षात भाकरी फिरवण्याची वेळ आलेली आहे, शरद पवार आणि जयंत पाटील हे पुढच्या काही दिवसांत संघटनेत मोठे बदल करतील”, असं रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
हेही वाचा : “मी शिंदेंना तेव्हाच सांगितलं होतं की भाजपाकडून…”, बच्चू कडूंचा दावा; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं भाष्य!
रोहित पवार काय म्हणाले?
शरद पवार नेहमी सागंत आले की योग्य वेळी भाकरी फिरवावी. मग आता तुमच्या पक्षात आणि संघटनेत भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे असं वाटतं का? असा प्रश्न रोहित पवार यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना रोहित पवार यांनी म्हटलं की, “शंभर टक्के ती (भाकरी फिरवण्याची) वेळ आलेली आहे. शरद पवार आणि जयंत पाटील हे स्वत: त्यामध्ये लक्ष घालतील आणि संघटनेत पुढच्या काही दिवसांत मोठे बदल करतील. हे बदल झाल्यानंतर ज्या-ज्या लोकांना जबाबदारी दिली जाईल ते अजून ताकदीने येणाऱ्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुका ते त्या ठिकाणी मनापासून लढतील असा विश्वास माझ्या सारख्याला वाटतो”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
विरोधी पक्षनेतेपदासाठी रोहित पवारांचे मोठे संकेत
रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या गटनेते आणि प्रतोद निवडीबाबतही भाष्य केलं. ते म्हणाले की, “प्रतोद पदी कोणाची निवड करायची याची चर्चा पक्षाच्या बैठकीत सुरु होती, त्या ठिकाणी शरद पवार देखील होते. त्या बैठकीत मीच विनंती केली की रोहित पाटील यांना मुख्य प्रतोद म्हणून संधी द्यावी. त्यामुळे माझ्यावर अन्याय झाला हे बोलणं योग्य ठरणार नाही. मात्र, येत्या काळात जे संविधानिक पद असतं, ज्या काही कमिट्या विरोधी पक्षाला दिल्या जातात, त्यामध्ये कदाजित माझ्यासारख्याला संधी मिळू शकते. त्यामुळे काल जे पदे दिली आहेत ते खूप विचार करून दिली आहेत”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.