२०१९ साली अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शपथविधी घेतली होती. पण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे तो शपथविधी फसला होता. आताही अजित पवारांसह ९ आमदांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. पण, या बंडाला शरद पवार यांची मूकसंमती असल्याचं बोललं जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“शरद पवार यांचा राजकीय आणि सामाजिक अनुभव हा ६० वर्षाचा आहे. अशा पद्धतीने एवढा मोठा अनुभव असताना शरद पवारांच्या मनात काय, हे लोकांना राजकीय दृष्टीकोणातून कळत नाही. त्यामुळे शरद पवार काहीही करू शकतात, अशी भूमिका सर्वांची झाली आहे. या भूमिकेच्या आड काहीजण लपतात असं वाटतं. पण, याबद्दल शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे आणि करतील,” असं रोहित पवार म्हणाले.
हेही वाचा : ठिणगी पडली! अमोल मिटकरींनी ‘त्या’ प्रकरणावरून जितेंद्र आव्हाडांना खडसावलं; म्हणाले, “शरद पवार…”
अजित पवारांबरोबर असलेल्या आमदारांना काय आवाहन करणार? असा प्रश्न विचारल्यावर रोहित पवार यांनी म्हटलं, “मी आवाहन करणारा कुणीही नाही. हे सर्व आमदार माझ्यामुळे नाहीतर, शरद पवार आणि पक्षामुळे निवडून आले आहेत. त्यामुळे कोणामुळे निवडून आलो, हे मनात ठेवावं. मी कोणत्याही आमदारांना फोन केला नाही. आपलं काही सहकार्य असेल, तर बोलू शकतो. पण, हक्काने शरद पवार आणि अजित पवार बोलू शकतात.”
हेही वाचा : “अजित पवारांना अर्थखात्याचा पदभार दिला, तर…”, शिंदे गटातील नेत्याचं विधान
“अजित पवारांबरोबर गेलेल्या काही लोकांनाही आमदारांना बोलण्याचा हक्क नाही. जो काही अधिकार आहे, तो शरद पवार आणि अजित पवारांना आहे,” असं रोहित पवारांनी सांगितलं.