राज्यामध्ये मागील महिन्याभरापासून सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. रोहित यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं समर्थन करणाऱ्या गटाकडून पवार कुटुंबियांना का लक्ष्य केलं जातंय याबद्दल भाष्य केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिल्ल्या मुलाखतीमध्ये महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर शिवसेनेच्या बंडखोर गटाकडून शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खापर फोडण्यामागील कारणं काय असू शकतात याबद्दलच्या प्रश्नालाही रोहित यांनी उत्तर दिलं आहे.
नक्की पाहा >> Photos: “उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या आदेशानेच पवारांवर पातळी सोडून टीका”; बापाचा उल्लेख करत अजित पवारांनी इशारा दिलेल्या नेत्याचा गौप्यस्फोट
“निवडणूक आली, सरकार स्थापन करायचं असलं की राष्ट्रवादीची गरज लागते. भाजपा सरकारला २०१४ राष्ट्रवादीच्या अदृश्य हातांची मदत झाली होती. महाविकास आघाडीच्या स्थापनेतही राष्ट्रवादीची प्रमुख भूमिका होती. अचानक सरकार पडतं आणि सरकार पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवारांवर टीका होतेय. शरद पवारांनी शिवसेना फोडली, अजित पवारांनी निधी दिला नाही असं म्हणतात यात विरोधाभास वाटतो का?” असा सविस्तर प्रश्न ‘आयबीएन लोकम’त या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रोहित पवार यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर रोहित पवार यांनी आपली भूमिका मांडताना स्पष्टपणे पवारांवर खापर फोडल्यास आपला मार्ग सोपा होईल असं बंडखोर गटाला वाटत असावं असं मत व्यक्त केलं आहे.
नक्की वाचा >> “आपणच मुख्यमंत्री आहोत हे एकनाथ शिंदेंना सिद्ध करुन दाखवावं लागेल”
“गेल्या ५०-५५ वर्षांमध्ये महाराष्ट्रात शरद पवारांविरोधात बोलल्याशिवाय महाराष्ट्रात राजकारण झालेलं नाही. काहीही झालं की शरद पवारांवर बोलायचं. ट्रकभरुन पुरावा २० वर्षांपूर्वी निघाला होता तो अजून पोहचलेला नाही,” असा टोला रोहित यांनी प्रश्नाला उत्तर देताना लगावला. पुढे बोलताना त्यांनी, “शरद पवार हसले, हसले नाहीत, इकडे तिकडे पाहिलं तरी त्याच्या बातम्या होतात. ते इतके मोठे राजकारणी आहेत की त्यांनी काहीही केलं तरी त्यांच्या मनात काय आहे हे लोकांना जाणून घ्यायचं असतं. महाराष्ट्रात काहीही झालं तर पवारांमुळे झालं असं महाराष्ट्रातील लोकांना वाटतं,” असंही म्हटलं.
नक्की वाचा >> “शिंदे-भाजपा सरकार म्हणू नका…”, ‘त्या’ प्रश्नावर चिडले मुनगंटीवार; घराणेशाहीवरुन टीका करत म्हणाले, “पक्ष कार्यकर्त्यांचा की…”
सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये बंडखोर एकनाथ शिंदे गटाचे नेते राष्ट्रवादी आणि शरद पवारांवर का टीका करत आहेत याबद्दल बोलताना रोहित पवार यांनी, “आजची परिस्थिती पाहिली तर जो (शिंदे) गट आहे त्यांना ठाकरे कुटुंबियांविषयी बोलून अजिबात चालणार नाही. ते धोरण असू शकतं. कारण तसं केलं तर शिवसैनिक नाराज होईल. मग खापर कोणावर फोडायचं? मग चला पवार साहेब आहेतच नेहमीप्रमाणे. शरद पवार आणि अजित पवारांवर खापर फोडलं तर आपले विषय सोपे होतील असं त्यांना वाटत असणार,” असं म्हटलंय.