Rohit Pawar On EVM And Assembly Election Result : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुतीने दमदार कामगिरी केली. राज्यात महायुतीने २३५ जागांवर विजय मिळवला असून महाविकास आघाडीला अवघ्या ४९ जागांवर विजय मिळाला आहे.त्यामुळे राज्यात महायुतीचंच सरकार पुन्हा स्थापन होणार हे निश्चित झाले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून भाजपा आणि महायुतीला विधानसभेत मिळालेल्या विक्रमी मताधिक्यावर शंका व्यक्त केल्या जात आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी तर हा निकाल आपल्याला मान्य नसल्याचे म्हटले आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी वेगळीच शंका व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित पवार यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी गुजराती ईव्हीएमच्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात विजयी झालेल्या उमेदवारांना मिळालेली मते जवळपास सारखीच असल्याबद्दल शंका उपस्थित केली आहे.

निवडणूक आयोग नेमकं काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे? असा प्रश्न विचारत रोहित पवारांनी आकडेवारी असलेली यादी देखील सोबत दिली आहे. रोहित पवार एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले की, “गुजराती ईव्हीएमच्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली का? नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांना मिळालेली मते जवळपास सारखीच कशी? एका सामान्य नागरिकाने सदरील आकडेवारी पाठवत विचारलेला हा प्रश्न नक्कीच विचार करायला भाग पाडतो”. यासोबत त्यांनी विजेत्या उमेदवारांची नावे आणि त्यांना मिळालेली मते देखील दिली आहेत.

हेही वाचा>> Donald Trump : भारतासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची Good News; ‘त्या’ यादीतून भारताला वगळले

पुढे रोहित पवारांनी निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण मिळण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “निवडणूक आयोग तर समोर येऊन काय खरं – काय खोटं हे सांगायला तयार नाही. आयोग नेमकं काय लपविण्याचा प्रयत्न करत आहे? की लोकशाहीला उद्ध्वस्त करण्याचा विडा आयोगाने उचलला आहे? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे राज्यातील सामान्य जनतेला हवी आहेत…तरी आयोग जनभावना लक्षात घेऊन लवकरच स्पष्टीकरण देईल, ही अपेक्षा!”.

यादीमध्ये या नेत्याची नावे

राोहित पवारांनी दिलेल्या यादीमधे शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजपाच्या विजयी उमेदवारांचा नावे आणि त्यांना मिळालेली मते देण्यात आली आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सुहास कांदे – १३८०६८ , माणिकराव कोकाटे – १३८५६५ , नरहरी झिरवाळ – १३८६२२ , हिरामन खोसकर – ११७५७५, नितीश पवार ११९१९१, दिलीप बनकर – १२०२५३, राहुल ढिकले १५६२४६, दादा भुसे – १५८२८४, दिलीप बोरसे – १५९६८१, देवयानी फरांदे – १०५६८९ आणि डॉ. राहुल आहेर – १०४८२६ या उमेदवारांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar questions to election commission over mahayuti candidate winning margin in nashik assembly election results rak