छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामी यांनी घडवलं, असं विधान उत्तर प्रदेशचे मुख्यंमत्री योगी आदित्यनाथ यांनी आळंदी येथे केलं. या विधानाचा रोहित पवारांनी निषेध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊंऐवजी तिसऱ्याच व्यक्तीने घडवलं, असं कुणी म्हणत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो. अजित पवार गट पूर्वी भाजपा विरोधात असताना अशा विधानांचा निषेध करत होता. आज ते भाजपाबरोबर गेले आहेत, त्यामुळे या विधानावर ते आता काय भूमिका घेणार? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला.
रोहित पवार पुढे म्हणाले की, योगी आदित्यनाथ यांचा निषेध नोंदविण्यासाठी उपमुख्यमंत्री आळंदीच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालणार की तिथे जाणार? हे आता पुढच्या काळात दिसेल.
काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
योगी आदित्यनाथ यांनी आळंदीत सुरू असलेल्या गीता- भक्ती अमृत महोत्सवाला उपस्थिती लावली. यावेळी आपल्या भाषणात योगी आदित्यनाथ म्हणाले, “समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण भारतभर चेतना निर्माण केली. त्या कालखंडात औरंगजेबाच्या सत्तेला आव्हान देत असताना त्यांनी औरंगजेबाला इथे मरण्यासाठी सोडलं. तेव्हापासून आजपर्यंत औरंगजेबाला कुणीही विचारत नाही. ही शौर्य आणि पराक्रमाची धरणी आहे, कारण या मातीत पूज्य संतांचे सानिध्य प्राप्त झाले.”
योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, मला आळंदीत येण्याची खूप पूर्वीपासूनची इच्छा होती. मी लहानपणी ज्ञानेश्वरीचे वाचन केले होते. तेव्हापासून मला दिव्यविभूतीचे दर्शन घ्यायचे होते. अवघ्या १५ व्या वर्षी ज्ञानेश्वरीचे लिखाण करून ज्यांनी २१ व्या वर्षी समाधी स्वीकारली, त्या ज्ञानेश्वर माऊलींचे आज मला दर्शन घेता आले.
अजित पवार राज्यसभेलाही घरातलाच उमेदवार देणार
अजित पवार आता बदलले आहेत. त्यांच्या गटातील काही नेते मला भेटले आणि त्यांनी सध्याच्या राजकीय वातावरणाबाबत माहिती दिली. अजित पवार लोकसभेला घरातल्याच व्यक्तीला संधी देतील. तसेच राज्यसभेसाठीही घरातीलच उमेदवाराला संधी देणार आहेत, असे बोलले जात आहे. शेवटी अजित पवार त्या पक्षाचे मालक आहेत, त्यामुळे ते ठरवतील तसा निर्णय होईल, अशी उपरोधिक टीकाही रोहित पवार यांनी केली.
रोहित पवार पुढे म्हणाले की, मागच्या आठवड्यात अजित पवार यांनी बारामतीमध्ये जे विधान केले, ते पाहून दुःख झालं. बदललेले अजित पवार मला पाहायला मिळाले. यावरून असे दिसते की, सुप्रिया सुळेंच्या विरोधात ते घरातीलच उमेदवार देतील.