मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना काही दिवसांपूर्वी बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले होते. या आंदोलनादरम्यान, बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. तसेच त्यांच्या बीड शहरातील घरावरही दगडफेक झाली. त्यापाठोपाठ आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरावरही दगडफेक झाली, त्यांच घर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी क्षीरसागर यांच्या घर आणि कार्यालयावर झालेला हल्ला हा मराठा आंदोलकांनी केल्याचा आरोप केला आहे. भुजबळ यांनी हिंगोली येथील ओबीसी एल्गार सभेत थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले.
दुसऱ्या बाजूला, “माझ्या घरावर झालेला हल्ला हा मराठा आंदोलकांनी केला नव्हता”, असं आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. तसेच, मनोज जरांगे पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना संदीप क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जरांगे यांची भेट घेतली होती. या भेटीवरून छगन भुजबळ यांनी क्षीरसागर आणि रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. भुजबळांच्या या टीकेला, आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे.
रोहित पवार यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी रोहित पवार म्हणाले, छगन भुजबळांचं आजचं भाषण हे आधीच्या भाषणापेक्षा चांगलं होतं. मी सगळीकडे राजकारण करत नाही, त्यामुळेच हे बोलतोय. मुळात संदीप क्षीरसागर यांचं घर कोणी जाळलं याचं उत्तर सरकारने द्यावं. संदीप क्षीरसागर आणि इतरही नेते आहेत, समाजिक कार्यकर्ते आणि दुकानदार आहेत, ज्यांची घरं जाळण्यात आली. यामागे कोणीतरी सत्तेत असणारी व्यक्ती आहे. सात तास पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीत, पोलीस नुसतं आंदोलकांबरोबर जातात. हे सगळं संशयास्पद आहे. हे व्यावसायिक गुंड कोण होते, त्यांनी पेट्रोल बॉम्ब टाकले, फॉस्फरस बॉम्ब टाकले. घरांना नंबर देऊन विशिष्ट पद्धतीने काम करत होते. ते सराईत गुंड कोण होते? त्याचा अभ्यास सरकारने करावा.