देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी एक राजकीय खेळी असू शकते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
“जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात उत्तम काम करत आहे. जयंत पाटील हे अधून-मधून वेगवेगळ्या प्रकारची विधानं करत असतात. त्याला वेगवेगळे अर्थ असतात. मात्र, त्या शपथविधीच्या वेळी नेमकं काय घडलं? हे शरद पवार आणि अजित पवार यांनाच माहिती आहे. ते दोघंही याच्यावर काहीही बोलत नाही. त्यामुळे ही नेमकी कोणाची खेळी होती? हे आजतरी सांगता येणार नाही”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.
“आज महाराष्ट्रात शेतकरी, तरुण आणि ग्रामीण भागातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. याकडे सत्तेत असणाऱ्या लोकांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि विरोधात असणाऱ्यांनीही सत्तेत असणारे लोकं हे प्रश्न कसे सोडवतात, याकडे लक्ष देण्याची गरज आहे”, असेही ते म्हणाले.
जयंत पाटील नेमकं काय म्हणाले होते?
‘एबीपी माझा’शी बोलताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी एक राजकीय खेळी असू शकते, असा दावा जयंत पाटील यांनी केला होता. “मला वाटत नाही की अजित पवार काही बोलले असतील. पण त्यावेळी राज्यात (२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर) राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठविण्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने केलेली ही एक खेळी असू शकते. त्यामुळे मला वाटत नाही की त्याला यापेक्षा जास्त काही महत्त्व आहे. त्यावेळी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यांना आज महत्त्व नाही. त्यानंतर अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम केले”, असं ते म्हणाले होते.