राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याबाबत मोठं विधान केलं होतं. अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं असेल तर त्यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करू. जेव्हा वेळ येईल, तेव्हा त्यांना मुख्यमंत्री करू, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. देवेंद्र फडणवीसांच्या या विधानावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी टीकास्र सोडलं आहे.
देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांना पुन्हा कधीतरी मुख्यमंत्री करू, असंच म्हणाले असतील. आता मुख्यमंत्री करू, असं ते (देवेंद्र फडणवीस) कधीच म्हणणार नाहीत, अशी टीका रोहित पवारांनी केली. देवेंद्र फडणवीसांना ‘पुन्हा’ हा शब्द खूप आवडतो, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- एकनाथ शिंदेंची साथ असताना अजित पवारांना युतीत का घेतलं? फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…
अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस असं कधीही म्हणणार नाहीत की, अजित पवारांना आता मुख्यमंत्री करू. ते नेहमी म्हणतील पुन्हा कधीतरी मुख्यमंत्री करू. त्यांना ‘पुन्हा’ हा शब्द खूप आवडतो.
हेही वाचा- “…तेव्हा अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू”, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य
“जेव्हा रुग्णालयात सामान्य लोक मरण पावतात, तेव्हा आम्ही पुन्हा कधीतरी निर्णय घेऊ. जेव्हा शेतकरी अडचणीत असतात, तेव्हा आम्ही पुन्हा कधीतरी निर्णय घेऊ, असं ते म्हणतात. म्हणजे या सरकारमधील सगळे नेते झोपलेत का? त्यांना कळत नाही का? सरकारमध्ये काय सुरू आहे?” असा संतप्त सवालही रोहित पवारांनी विचारलं.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?
अलीकडेच एका इंग्रजी वृत्तवाहिनीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली होती. यावेळी सहा महिन्यात अजित पवार मुख्यमंत्री होतील, या चर्चेबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पहिली बाब म्हणजे सहा महिन्यांत कोणत्याही गोष्टी बदलत नाहीत. अजित पवारांना जेव्हा मुख्यमंत्री बनवायचं असेल, तेव्हा त्यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू. जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्यांना मुख्यमंत्री करू.”