भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना दिसतात. त्यांनी पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं. गोपीचंद पडळकरांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांना शकुनीमामा म्हटलं आहे. ठाकरे गटाच्या पक्षप्रमुखांना शकुनीमामा समजेपर्यंत त्यांच्या पक्षात केवळ बापलेकच उरतील, असं विधान पडळकरांनी केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचं ट्विटर हँडल टॅग करत म्हटलं, “उबाठा पक्ष प्रमुखांना ‘शकुनी काका’ समजेपर्यंत त्यांचा पक्ष कदाचित फक्त बाप लेकांचाच उरेल.” पडळकरांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी गोपीचंद पडळकरांचा उल्लेख ‘चॉकलेट बॉय’ असा केला आहे. गोपीचंद पडळकर हे चॉकलेट बॉय आहेत. ते स्वत:च्या प्रसिद्धीसाठी काहीही बोलतात, त्यामुळे आपण त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, अशी खोचक प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- “शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांची भीती वाटत होती, कारण…”, बावनकुळेंचं थेट विधान!

पडळकरांनी शरद पवारांचा उल्लेख ‘शकुनीमामा’ केल्याबद्दल विचारलं असता रोहित पवार म्हणाले, “कोण पडळकर?… ओह… ते चॉकलेट बॉय… राज्यात चॉकलेट बॉयची एक जोडी आहे. ते एसटी कर्मचाऱ्याच्या आंदोलनात जातात, तिथे रात्री झोपतात. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात जाऊन तिथे रात्री झोपतात. स्वत:चा सत्कार तिथे करून घेतात. विजयाची मिरवणूक काढतात. पण साधं परिपत्रक काढू शकत नाहीत. त्यामुळे हे चॉकलेट बॉय जे-जे बोलतील, जे जे ट्वीट करतील, ते स्वत:च्याच प्रसिद्धीसाठी असतं. त्यामुळे अशा चॉकलेट बॉयजकडे किती लक्ष द्यायचं, हे आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे.”

हेही वाचा- “उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची माती…”, १४ वर्षे तुरुंगात राहण्याची तयारी असल्याचं म्हणत नवनीत राणांचा हल्लाबोल!

MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, मुख्यमंत्री प्रचारात मग्न

एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारात मग्न आहेत. आज तरुणांसोबत शरद पवार यांनी वेळ दिलेला असताना मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे ही बैठक झाली नसावी, असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar reaction on gopichand padalkar called chocolate boy after padalkar said shakunimama to sharad pawar rmm