राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने शिर्डी येथे आयोजित केलेल्या शिबिरात जितेंद्र आव्हाड यांनी रामाबाबत केलेले विधान वादाच्या केंद्रस्थानी ठरले. या विधानानंतर खुद्द पवार गटातील नेत्यांमधील विसंवाद चव्हाट्यावर आला. आव्हाड यांच्या विधानानंतर रोहित पवार यांनी केलेले ट्विट आव्हाड यांना चांगलेच बोचल्याचे दुसऱ्या दिवशी घेतलेले पत्रकार परिषदेत दिसले. रोहित पवार हे लहान असून ते आमदार म्हणून नवखे आहे, त्यांना मी फार महत्त्व देत नाही, इथपर्यंत आव्हाड यांनी आपला संताप व्यक्त केला होता. परदेशात गेलेले रोहित पवार आज महाराष्ट्रात आले असून त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मागच्या दोन तीन दिवसांपासून चाललेल्या घडामोडींवर सविस्तर भाष्य केले. यावेळी आव्हाड यांच्याशी झालेल्या वादावरही त्यांनी आपली भूमिका मांडली.

हे वाचा >> ‘मी तर ‘रामकृष्ण हरी’ वाली’, जितेंद्र आव्हाड वि. रोहित पवार वादानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ते मोठे नेते..”

काय म्हणाले रोहित पवार?

श्रीराम मांसाहारी होते, असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. त्यानंतर रोहित पवार यांनी अबू धाबीमधून एक्स या सोशल मीडिया साईटवर आपली भूमिका मांडली होती. आज पत्रकार परिषदेत त्यावर बोलताना ते म्हणाले, “इतिहासात काय घडले, हे मला माहीत नाही. देव, धर्म हा वैयक्तिक विषय आहे. मी लहानपणापासून देवळात जातो. देव, धर्मावर जेव्हा कुणी राजकीय प्रतिक्रिया द्यावी, हेच भाजपाला हवे असते. आज बेरोजगारी, महागाई सारखे प्रश्न महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रातील मोठे मोठे प्रकल्प राज्याबाहेर आणि गुजरातमध्ये जात आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न उग्र बनले आहेत. त्यावर सरकारकडून कोणतेही भाष्य केले जात नाही आणि अशावेळी जेव्हा आव्हाड यांनी देव-धर्मावर विधान केले, तेव्हा सरकारला आयता विषय मिळाला. सामान्य माणसाच्या प्रश्नावर बोलण्याऐवजी ते याच विषयावर आंदोलन करताना दिसतात. धर्म हा व्यक्तिगत विषय असून त्यावर जाहीर बोलू नये, याचा फायदा भाजपाला होत आला आहे.”

“मला जे योग्य – अयोग्य वाटते, ते मी बोलून दाखवितो. मी मनात वेगळे आणि मुखावर वेगळे ठेवत नाही. आव्हाड यांचे वक्तव्य या वातावरणात योग्य वाटले नाही, म्हणून मी बोलून दाखविले. त्यानंतर माझ्याबद्दल ते स्वतः बोलले आहेत. तसेच त्यांनी त्यांच्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली आहे, त्यामुळे आमच्यासाठी हा विषय संपलेला आहे”, असेही यावेळी रोहित पवार यांनी सांगितले.

ईडीला मी घाबरलेलो नाही

ईडीच्या कारवाईवर बोलत असताना रोहित पवार म्हणाले की, काल सकाळी (दि. ५ जानेवारी) माझ्या कंपनीवर कारवाई झाली आणि मी संध्याकाळी भारतात आलो. काही चूक असते तर मी आलोच नसतो. याआधी ज्यांच्या ज्यांच्यावर अशी कारवाई झाली, तेव्हा ते दिल्लीला तरी गेले किंवा त्यानंतर सत्ताबदल झालेला आपण पाहिला. मी अजिबात घाबरलेलो नाही आणि याबाबत सहानुभूतीही घेत नाही. ईडीच्या अधिकाऱ्याना ज्या गोष्टी सांगितल्या जातात, त्याप्रमाणे ते येतात आणि तपास करून जातात. पण ईडी आणि आमच्यातील काही गोष्टी माध्यमात कशा आल्या? हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. यावरूनच काही लोकांना यात राजकारण करायचे आहे, असे दिसते.

फडणवीस यांनी गृहखात्यावर लक्ष द्यावं

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना रोहित पवार म्हणाले की, तुम्ही ज्या दिवशी ज्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर असता त्याच जिल्ह्यात दिवसाढवळ्या खून होतात. त्याकडे देवेंद्र फडणवीसांनी लक्ष दिले पाहीजे. संपूर्ण भारतात कायदा व सुव्यवस्थेची वाईट परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे. मला असे वाटते की, देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा कामाचा ताण वाढलेला आहे. त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्रीपद बाजूला ठेवून केवळ गृहखात्यावर लक्ष केंद्रीत करावे. तिथे तरी त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न करावा. देवेंद्र फडणवीस स्वतः काय करू शकतात, यावर त्यांनी अधिक बोलण्याची गरज आहे. इतरांवर फारसे लक्ष देण्याची गरज नाही, असा सल्ला देत असताना रोहित पवार यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.