काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. २०१९ मध्ये राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून टिप्पणी केली होती. मेहुल चोक्सी, नीरव मोदी, विजय माल्या अशा कर्जबुडव्या फरार व्यापाऱ्यांसह नरेंद्र मोदी यांचं नावं घेतं, राहुल गांधींनी “सर्व चोर मोदीच का असतात?” असा सवाल विचारला होता. याप्रकरणी सूरतमधील सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली.
त्यानंतर राहुल गांधींची खासदारकीही रद्द करण्यात आली आहे. याप्रकरणी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या घटनाक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज देशात आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. अशा प्रयत्नांचा निडर वृत्तीने आणि धैर्याने केला जाणारा सामना अत्यंत आशादायक आहे, असं विधान रोहित पवार यांनी केलं. त्यांनी एक ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
हेही वाचा- अपात्रतेनंतर राहुल गांधी खासदार म्हणून मिळणाऱ्या कोणत्या सोयी-सुविधा गमावणार?
रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, “लोकशाहीसाठी आणि न्यायासाठी उठणारा सत्य व सर्वसामान्यांचे पाठबळ असलेला बुलंद आवाज दाबण्याचा सत्ताधीशांनी कितीही प्रयत्न केला, तरी तो आवाज दाबला जात नाही, हा इतिहास आहे.आज देशात अशा आवाजांना दाबण्याच्या प्रयत्नांचा अत्यंत निडर वृत्तीने आणि धैर्याने सामना केला जात आहे. हे चित्र अत्यंत आशादायक असून हाच आवाज उद्याच्या सक्षम आणि सुरक्षित लोकशाहीची पायाभरणी करेल, यात कुठलीही शंका नाही.”