राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली आहे. अजित पवार सत्तेत सामील झाले, यामागे शरद पवारच आहेत, असं मी आधीच सांगितलं होतं. शरद पवारांनी एक टीम आधी पाठवली. आता दुसरी जाईल. हे सगळे आतून एकमेकांना मिळालेले आहेत, अशी टीका राज ठाकरेंनी केली. राज ठाकरेंच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
गेल्या लोकसभेच्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सामान्य लोकांचे आणि युवांचे प्रश्न खूप प्रखरपणे मांडत होते. मात्र, आता त्यांची नवीन भूमिका भारतीय जनता पार्टीच्या जवळ जाणारी आहे. येथून पुढे राज ठाकरे पहिल्यासारखं सर्वसामान्य लोकांचे प्रश्न कधी मांडतील, याची आम्हाला प्रतीक्षा आहे, अशा शब्दांत रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा- “…तर आम्ही भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवू”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
राज ठाकरेंच्या टीकेवर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, “मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या लोकसभेच्या काळात सामान्य लोकांचे आणि युवांचे प्रश्न खूप प्रखरपणे मांडत होते. मनसेनं आता जी नवीन भूमिका घेतली आहे, ती भूमिका काही प्रमाणात भाजपाच्या जवळ जाणारी आहे. ते सध्या भाजपाप्रमाणे बोलतात, असं मला वाटतं. मी याच्या खोलात जाणार नाही. पण पूर्वीचे राज ठाकरे जे आपल्या सर्वांना माहीत होते. ते राज ठाकरे परत कधी दिसणार? ते सामान्य लोकांचे विषय मांडत होते, यापुढे ते कधी सामान्य लोकांचे प्रश्न मांडतील, याची आम्हाला प्रतीक्षा आहे.”
हेही वाचा- “अजित पवारांना मुळीच मुख्यमंत्री केलं जाणार नाही”, काँग्रेसच्या माजी खासदाराचं मोठं विधान
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
शरद पवार आणि अजित पवारांच्या गुप्त भेटीबाबत राज ठाकरे म्हणाले, “तुम्ही माझं ऐकत नाही. मी सांगितलं होतं ना तेव्हा? हे त्यांचंच स्वत:चं आहे. त्यांनी एक टीम आधी पाठवली. आता दुसरी जाईल. हे सगळे आतून एकमेकांना मिळालेले आहेत. हे आज नाही, २०१४ पासून मिळाले आहेत. पहाटेचा शपथविधी तुम्हाला आठवत नाही का? शरद पवार आणि अजित पवार यांना भेटायची जागा चोरडिया या नावाच्या व्यक्तीकडे मिळाली हीदेखील कमाल आहे.”