अजित पवारांना बरोबर घेऊन भाजपाने स्वतःची किंमत केली, अशा प्रकारची टीका राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर या साप्ताहिकातून करण्यात आली होती. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावरून विविध राजकीय प्रतिक्रियादेखील उमटू लागल्या आहेत. दरम्यान, यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ( शरद पवार गट ) आमदार रोहित पवार यांनी भाजपा आणि अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “अजित पवारांना बरोबर घेऊन भाजपाने स्वतःची किंमत केली”, संघाच्या मुखपत्रातून टीका

काय म्हणाले रोहित पवार?

“अजित पवार यांना बरोबर घेऊन भाजपाने स्वत:ची किंमत कमी केल्याची टीका ऑर्गनायझरमधून केल्याचं नुकताच वाचनात आलं. मात्र, केवळ राज्यातच भाजपाला अपयश मिळालं असतं तर ही टीका योग्य ठरली असती, पण भाजपाची किंमत ही लोकांनी कमी केली असून संपूर्ण देशातच त्यांची कमी झाली आहे”, अशी टीका रोहित पवार यांनी केली.

भाजपाने अजित पवारांची किंमत कमी केली

“मुळात भाजपाने अजित पवार यांची किंमत कमी केली असून हे वास्तव आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून हेच सांगतो आहे. आमचं म्हणणं आता खरं होताना दिसत आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं ही भाजपाची जुनी सवय आहे. लोकांनाही हे आता लक्षात आल्याचं यंदाच्या निवडणुकीत दिसून आलं”, असेही ते म्हणाले.

नाना पटोलेंचीही भाजपावर बोचरी टीका

तत्पूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही ऑर्गनायझरमधील लेखावरून भाजपावर बोचरी टीका केली होती. “संघ भाजपाला सुचना देते की नाही, हे आम्हाला माहिती नाही. मात्र, सध्या भाजपा संघाचं ऐकत नाही. हे स्पष्ट आहे. आम्हाला संघाची आवश्यक नाही, हे भाजपाच्या नेत्यांनी बोलून दाखवलं आहे. त्यामुळे संघ त्यांना सुचना का करते? असा प्रश्न जनतेला पडला आहे”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार वातावरण? समर्थकांमध्ये सोशल मीडियावर जुंपली

ऑर्गनायझरमध्ये नेमकी काय टीका करण्यात आली?

दरम्यान, ऑर्गनायझर साप्ताहिकात संघाचे आजीव सदस्य रतन शारदा यांनी भाजपाच्या डोळ्यात अंजण घालणारा लेख लिहिला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे हवेत गेलेल्या भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी लोकसभा निवडणुकीचा निकाल त्यांना वास्तवाची जाण करून देणारा ठरला आहे. मोदींच्या लोकप्रियतेमुळे तळातील सामान्यांचा आवाज न ऐकणाऱ्या भाजपाला ही एक चपराक असल्याचे ऑर्गनायझरच्या लेखात म्हटले आहे.

याशिवाय लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पराभवाला नको असलेले राजकारण कारणीभूत असल्याची टीकाही या लेखातून करण्यात आली आहे. “महाराष्ट्रात काही गोष्टी टाळता आल्या असत्या. जसे की, भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतले गेले. यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपाच्या समर्थकांना धक्का बसला. या एका कारणामुळे भाजपाने आपली किंमत कमी करून घेतली, असंही रतन शारदा यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar reaction on rss mouthpiece organiser criticized bjp over loksabha election ajit pawar spb
Show comments