Rohit Pawar Reaction on Sunanda Pawar Statement : शरद पवार यांच्या वाढदिवशी राजकीय पटलावर अनेक गोष्टी घडल्या. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली. एवढंच नव्हे तर दिल्लीतही शरद पवारांनी अमित शाहांची भेट घेतली. दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली. या चर्चेला आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनीही अधोरेखित केले. मूठ घट्ट असेल तर त्याची ताकद वाढते, असं त्या म्हणाल्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगू लागी. दरम्यान, यावरून आता रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुनंदा पवार नेमकं काय म्हणाल्या?
“अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येतील याबाबत काही सांगता येणार नाही. सगळ्याच कुटुंबांमध्ये मतभेद असतातच. मतभेद मिटतील. भविष्यात हे एकत्र येऊ शकतात. त्यांनी एकत्र यायला पाहिजे असे मला वाटते”, असेही सुनंदा पवार म्हणाल्या. “मूठ घट्ट असेल, तर त्याची ताकद राहते. आपण विखुरलेले राहू तर ती ताकद कमी होते. पण कुणी कुणासोबत जायला हवे हा निर्णय त्या दोघांनी घ्यायला हवा”, असेही त्या म्हणाल्या.
रोहित पवारांचं काय प्रत्युत्तर?
“माझी आई पवारांची सर्वांत मोठी सून आहे. कुटुंब एकत्रित राहावं अशी तिची भावना असावी, त्या दृष्टीकोनात तिने ते भावनिक वक्तव्य केलं असावं. तुम्ही मला विचारलंत तर ३७ वर्षे मी संपूर्ण कुटुंब एकत्र पाहिलं आहे. कुटुंब म्हणून तुम्ही म्हणालात तर एकत्र असणं नक्कीच चांगलं आहे”, असं रोहित पवार म्हणाले.
“कुटुंब आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी झाल्या. कुटुंब म्हणून एकत्र असलं पाहिजे, राजकीय भूमिकाही तितक्याच महत्त्वाच्या असतात. राजकीयदृष्ट्या आम्ही वेगळे आहोत. आई राजकीय नाही, ती सामाजिक आहे. सामाजिक दृष्टीकोनातून तिने काम केलं आहे. तिचं मन फार साफ आहे. मनात आणि ध्यानात कुठेही राजकारण नाही. तिने प्रमाणिकपणे व्यक्तिगत मत व्यक्त केलं. आपण भारतीय संस्कृतीत काम करणारे लोक आहोत. आपल्या संस्कृतीमध्ये कुटुंब एक राहणं यादृष्टीने आईने ते वक्तव्य केलं असावं”, असंही रोहित पवारांनी स्पष्ट केलं.