भारतीय जनता पार्टीने आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने राज्यसभेसाठी त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी कोणाची वर्णी लागणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून बाबा सिद्दीकी यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सध्या चालू आहे. सिद्दीकी गेल्या आठवड्यात काँग्रेसला खुदा हाफ़िज़ करून अजित पवार गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जावी, अशी मागणी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी केली आहे. पार्थ पवार समर्थकांनी आपली मागणी आक्रमकपणे मांडली आहे. यावर आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवणार का? असा प्रश्न पार्थ पवारांचे चुलत भाऊ आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर रोहित पवार म्हणाले, राज्यसभेवर विचारवंतांना पाठवलं जातं, वेगवेगळे पक्ष अभ्यासू लोकांना राज्यसभेवर पाठवतात. अशा लोकांना राज्यसभेवर पाठवल्यास त्याचा पक्षाला फायदा होतो. पार्थ पवारही असेच उमेदवार आहेत. एखादा असा विचारवंत व्यक्ती राज्यसभेवर जात असेल तर त्याचा महाराष्ट्राला आणि देशाला फायदा होऊ शकतो. पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवावं असं अजित पवार यांचं मत असेल तर त्यांनी तसा निर्णय घ्यावा. तो त्यांचा व्यक्तीगत विषय आहे.

दुसऱ्या बाजूला, काँग्रेसने माजी आमदार चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. तर भारतीय जनता पार्टीने अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी देऊ केली आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेच्या शिंदे गटाने मिलींद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. भाजपाकडून माजी मंत्री पंकजा मुंडे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत होती. परंतु, या सर्व चर्चांना आज पूर्णविराम लागला आहे. भाजपाने या दोन्ही नेत्यांऐवजी नुकतेच काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. तसेच भाजपाने कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना २०१९ मध्ये विधानसभेसाठी उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे त्या पक्षावर नाराज होत्या. त्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडेही याबाबत तक्रार मांडली होती. आज राज्यसभेसाठी त्यांना उमेदवारी देऊन भाजपाने एकप्रकारे त्यांचे पुर्नवसन केल्याचं दिसत आहे.

हे ही वाचा >> महाविकास आघाडीच्या जागावाटपाचं काय झालं? प्रकाश आंबेडकरांनी दिलं उत्तर; म्हणाले, “आम्ही त्यांना…”

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना गुजरातमधून राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली आहे. गोविंदभाई ढोलकिया, मयंकभाई नायक आणि डॉ. जशवंतभाई परमार यांनाही गुजरातमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर रेल्वेमंत्री अश्विनी वैश्णव यांना ओडिशातून उमेदवारी दिली आहे.