दादरा नगर हवेलीत लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी ५१ हजार मताधिक्क्यानं विजय मिळवला आहे. कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेरच्या पहिल्या खासदार आहे. दादरा नगर हवेलीचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर ही जागा रिक्त होती. मोहन डेलकर हे अपक्ष खासदार होते. त्यांच्या आत्महत्येनंतर डेलकर कुटुंबीय भाजपावर आरोप केले होते. त्यानंतर शिवसेनेनं पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कलाबेन डेलकर यांचे अभिनंदन केले आहे. तसेच भाजपाला खोचक टोला लगावला आहे. रोहित पवार म्हणाले, “दादरा-नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत विजयी झाल्याबद्दल शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांच मनःपूर्वक अभिनंदन! हा विजय म्हणजे भाजपाच्या दडपशाहीच्या राजकारणाला मिळालेलं सणसणीत उत्तर तर आहेच पण देशातील परिवर्तनाची नांदीही आहे.”

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. “दादरा नगर हवेलीत आज भगवा फडकला. लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीमती कलाबेन डेलकर यांचा विजय निश्चितच एका नव्या विकास पर्वाची नांदी आहे. अन्याय आणि हुकूमशाही विरुद्ध जनतेने दिलेला हा कौल असून आता जनतेच्या हितासाठी दिल्लीत शिवसेनेचा आवाज आणखी बुलंद होईल, हा विश्वास आहे,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.

कलाबेन डेलकर यांनी भाजपाच्या महेश गावित यांचा पराभव केला. कलाबेन डेलकर यांना १ लाख १६ हजार  ८३४ तर भाजपाच्या महेश गावित यांना ६६ हजार १५७ मतं मिळाली आहेत.

कलाबेन डेलकर यांनी भाजपाच्या उमेदवाराचा ५० हजार ६७७ मतांनी पराभव केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar reaction to kalaben delkar victory criticism of bjp lok sabha by election at dadra nagar haveli srk