आमदार रोहित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. छगन भुजबळ यांनी रोहित पवार यांच्या मतदारसंघात जाऊन उत्तर देणार असल्याचं आव्हान दिलं होतं. यावर रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मतदारसंघात माझ्याविरोधात एकत्र ताकद लावणार की वेगवेगळी लावणार आहात? असा थेट सवाल रोहित पवार यांनी भुजबळांना विचारला आहे.
छगन भुजबळ काय म्हणाले?
“मी १९८५ साली महापौर झालो. त्यानंतर चार महिन्यांनी तुमचा ( रोहित पवार ) जन्म झाला. मला मोठं केलं, मोठं केलं, अशा फालतून गोष्टी करू नका. इतिहास जाणून घ्या. त्यांना जास्त किंमत देत नाही. मतदारसंघात जाऊन मी उत्तर देणार,” असा इशारा भुजबळ यांनी दिला होता.
हेही वाचा : “आमचा विचार केला नाही, तर…”, महादेव जानकर यांचा भाजपाला इशारा
त्यावर ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना रोहित पवार म्हणाले की, “तेव्हा माझा जन्म झाला नव्हता, याला मी काय करू. जन्म आधी झाला असता, तर वेगळी गोष्ट असती का? ३७ व्या वर्षी मला निष्ठा, कुटुंब आणि शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचं महत्व कळतं. मी या वयात एका विचारसरणीबरोबर राहिलो. त्याच विचारसरणीमुळे छगन भुजबळ यांनी अनेक पदे भोगली.”
हेही वाचा : अपात्रतेच्या नोटिशीवर उत्तर देण्यास फक्त सात दिवसांचा कालावधी; संजय शिरसाट म्हणाले, “आमचे वकील…”
“माझ्या मतदासंघात येऊन ते ताकद दाखवत सभा घेणार आहेत. एकत्र ताकद लावणार की वेगवेगळी लावणार आहात? माझा विश्वास, तेथील कार्यकर्ते आणि मतदारसंघावर आहे. तुम्ही आर्थिक ताकद लावा किंवा माझे पदाधिकारी फोडण्याचा प्रयत्न करा,” असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.