भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. जगभर फिरण्यापेक्षा थोडं कर्जतमध्ये लक्ष दिलं, तर माजी आमदार लिहिण्याची वेळ येणार नाही, असं टीकास्र नितेश राणे यांनी रोहित पवार यांच्यावर सोडलं होतं. याला रोहित पवार यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.
“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्ष दिलं, तर कोण माजी आमदार होतंय पाहूया,” असं आव्हान रोहित पवारांनी नितेश राणेंना दिलं.
नितेश राणे काय म्हणाले?
“रोहित पवार सीनियर केजीमध्ये आहेत. अजूनही ते शाळेत पोहचले नाहीत. मिशी, दाढी आणि आवाजाचा कंठही रोहित पवारांना फुटलेला नाही. जगभर फिरण्यापेक्षा थोडं कर्जतमध्ये रोहित पवारांनी लक्ष द्यावे. अन्यथा माजी आमदार लिहिण्याची वेळ येईल,” असं नितेश राणे यांनी म्हटलं होतं.
हेही वाचा : “…तर संभाजीनगरमधील एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेला जाणार”, संजय राऊतांचा इशारा
“मला दाढी आहे. नितेश राणेंनी आरशात पाहावे. माजी हा शब्द नितेश राणेंना फार जवळचा वाटतो. कारण, निलेश राणेंबद्दल त्यांच्या मनात काही गोष्टी असाव्यात. नितेश राणेंनी आपल्या मतदारसंघात पाहिलं पाहिजे,” असा सल्ला रोहित पवारांनी दिला.
हेही वाचा : “राष्ट्रवादीत फूट पडली नसल्याचं निवडणूक आयोगाला सांगितलं होतं, पण…”, जयंत पाटलांची टीका
“नारायण राणे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्ल आमच्या मनात आदर आहे. नारायण राणेंबाबतच्या बऱ्याच गोष्टी शरद पवारांनी आम्हाला सांगितल्या आहेत. नितेश राणेंच्या निवडणुकीत शरद पवार सहसा लक्ष देत नाहीत. या निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मनापासून लक्ष दिलं, तर उद्या कोण माजी आमदार होतंय पाहूया,” असं रोहित पवार यांनी म्हटलं.