राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी आज ट्विटरवर #AskRohitPawar हा ट्रेंड सुरू केला. यावेळी नेटकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना रोहित पवारांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली. अगदी राजकीय विषयांपासून अनेकांच्या वैयक्तिक प्रश्नांवरही रोहित पवारांनी चांगल्याप्रकारे प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, ट्विटरवरील एका तरुणीने रोहित पवारांना आगळावेगळा प्रश्न विचारला. तिने तिचं एका मुलाबरोबर प्रेमसंबंध असल्याचा खुलासा केला. तसेच आम्ही पळून जाण्याचा निर्णय घेतला असून तुमच्या मते मी काय करावं? असा प्रश्न संबंधित तरुणीने रोहित पवारांना विचारला. यावर रोहित पवारांनी दिलेलं उत्तर सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
संबंधित तरुणीने #AskRohitPawar हा हॅशटॅग वापरत विचारलं, “दादा माझं एका मुलावर खूप प्रेम आहे. आम्ही दोघं लग्नही करणार आहोत. पण मुलाच्या घरचे आमच्या लग्नाला तयार होत नाहीयेत. त्यामुळे आम्ही दोघांनी पळून जायचा निर्णय घेतला आहे. तुमच्या मते मी काय करू?” यावर उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, “पळून जाण्यासाठी आई-वडिलांनी सहमती दिली असेल तर ते म्हणतात तसं नक्की करा.” रोहित पवारांची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, एका नेटकऱ्याने रोहित पवारांना विचारलं, “जर तुमचा बायोपिक करायचं ठरलं, तर तुमच्या व्यक्तीरेखेसाठी तुमची निवड कोण असेल? वैभव तत्ववादी की ललित प्रभाकर? यावर उत्तर देताना रोहित पवार यांनी सांगितले, “माझा रोल मलाच करायला आवडेल.”