आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडलेले दिसत आहेत. पण, येणाऱ्या काळात अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळणार आहे, असं विधान खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे. याला आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पक्षाचं चिन्ह असो किंवा नसो आमच्याकडं शरद पवार आहेत, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?
“आज पक्षात दोन गट पडलेले दिसत आहेत. सगळ्याबाबतीचा आम्हालाही अभ्यास आहे. उगच दिल्लीत ३२ वर्षे घालवले नाहीत. येणाऱ्या काळात निवडणूक आयोग निकाल देईल. तेव्हा, १०० टक्के अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पक्ष आणि घड्याळ चिन्ह आम्हालाच मिळणार आहे,” असं प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं.
हेही वाचा :“एअर इंडियाचा मॅनेजर उद्धव ठाकरेंना महिन्याला…”, नारायण राणेंचा खळबळजनक आरोप
“…म्हणून पटेलांना अहंकार आलेला दिसत आहे”
यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, “यालाच अहंकार म्हणतात. आम्हाला वाटायचं, भाजपा आणि त्यांच्याच नेत्यांना अहंकार आहे. पण, भाजपात गेल्यावर अहंकार येण्यासाठी दोन महिने लागले. निवडणूक आयोग निकाल देईल, तेव्हा देईल. मात्र, निवडणूक आयोग आपलंच ऐकतात, असं भाजपाचं नेते सांगतात. म्हणून पटेलांना अहंकार आलेला दिसत आहे.”
“…तर शरद पवारांकडे जनतेनं पाहिलं होतं”
“निवडणूक आयोगाच्या पूर्वीच हे स्व:घोषित निर्णय देत आहेत. याच्यातून समजून घ्यायचं की निवडणूक आयोग कदाचित भाजपाचं ऐकत आहे. १९९९ साली पक्षाची स्थापना झाल्यावर घड्याळाकडे नव्हे, तर शरद पवारांकडे जनतेनं पाहिलं होतं,” असं रोहित पवार यांनी म्हटलं.
हेही वाचा : “मराठा आरक्षणाबाबत २ दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
“स्वार्थी राजकारण आम्हाला जमणार नाही”
“पक्षाचं चिन्ह असो किंवा नसो, आमच्याकडं शरद पवार आहेत. स्वार्थी राजकारण आम्हाला जमणार नाही,” असं रोहित पवारांनी सांगितलं.