बहुप्रतिक्षित तलाठी भरती परीक्षेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली. बहुप्रतिक्षित तलाठी भरती परीक्षेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली. पण, त्यात अनेक उमेदवारांना एकूण २०० गुणांपैकी अधिक गुण मिळाल्याचे निदर्शनास आल्याने ही परीक्षा पद्धतीच वादात सापडली आहे. तर, तलाठी भरतीत एकेका जागेसाठी २५ लाख घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. यावरून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. आता रोहित पवारांनी विखे-पाटलांना आव्हान दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित पवार काय म्हणाले होते?

“तलाठी भरतीत अनेक ठिकाणी पेपरफुटीप्रकरणी गुन्हा दाखल झाला, पण या सरकारने पूर्णत: दुर्लक्ष केलं. तलाठी भरतीत एकेका जागेसाठी २५ लाखाहून अधिकची वसुली झाली. सरकार, अधिकारी, परीक्षा घेणारी कंपनी असे सर्वच यात सहभागी असून जवळपास १५०० कोटीहून अधिकचा हा घोटाळा आहे. केवळ काही कोटींच्या लाचेसाठी वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या लाखो युवांच्या, त्यांच्या आईवडिलांच्या स्वप्नांचा खून करण्याचं पाप या सरकारने केलं आहे,” अशी टीका रोहित पवारांनी केली होती.

“पूर्ण पारदर्शी प्रकारे तलाठी भरतीचे पेपर झाले”

रोहित पवारांच्या आरोपांवर राधाकृष्ण विखे-पाटलांनी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. “गुणवत्तेच्या आधारावर उत्तीर्ण झालेल्या तरूणांवर अन्याय का करायचा? रोहित पवारांनी भरतीसाठी २५ लाख रूपये घेतल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत. तलाठी भरतीत कुठलाही गैरव्यवहार आणि गैरप्रकार झाला नाही. पूर्ण पारदर्शी प्रकारे पेपर झाले आहेत. तरूणांमध्ये गैरसमज पसवणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करणारच,” असा इशारा विखे-पाटलांनी दिला होता.

“२०१४ ते २०१९ भाजपाच्या कार्यकाळात भरती प्रक्रियेत भ्रष्टाचारच”

यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, “महाराष्ट्रातील भरती प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. सतत पेपर फुटी होत आहे. २०१४ ते २०१९ भाजपा सरकारच्या कार्यकाळात भरती प्रक्रियेत भ्रष्टाचारच होत होता. आताच्या सरकारमध्येही तेच सुरू आहे. याबाबत कुणीही लक्ष देत नाही.”

“आता आमच्यावर कुठली कारवाई राहिली का?”

“आम्ही पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केल्यावर तरूण गंभीर नसल्याचं उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्यायचे. आता हा मुद्दा तरूणांनीच उपस्थित केला आहे. विखे-पाटलांनी आमच्यावर कारवाई करावी. आमच्यावर इतक्या कारवाई झाल्या आहेत, आता कुठली राहिली का? हा प्रश्न आहे. पण, तरूणांनी दिलेल्या पुराव्यांकडे लक्ष द्यावं,” असा सल्ला रोहित पवारांनी दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar reply radhakrushna vikhe patil over talathi bharti ssa