राज्यातील यंदाचा ऊस गळीत हंगाम १५ ऑक्टोंबरपासून सुरु करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. तरीही रोहित पवार यांच्याशी निगडीत असलेल्या इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे येथील बारामती अॅग्रो कारखान्याने त्यापूर्वीच हंगाम सुरु केला होता. हा सरकारच्या आदेशाचा भंग असल्याने कारखान्याच्या संचलकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपा नेते राम शिंदे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली होती.
मात्र, शेखर गायकवाड यांनी साखर कारखान्यास क्लिनचीट दिली होती. त्यानंतर राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच, साखर आयुक्तांसह बारामती अॅग्रो लिमिटेड प्रशासनाची उच्च स्तरीय चौकशीची मागणी राम शिंदे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती.
हेही वाचा : संजय राऊत यांना दिलासा नाहीच; दसऱ्यानंतर दिवाळीही तुरुंगातच
त्यावरून आता रोहित पवार यांनी राम शिंदेंचा समाचार घेतला आहे. “राम शिंदेंनी माझ्यावर कारवाईची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली. लहानपणी छोटे मुलं चॉकलेटसाठी रडतात, तसे आमचे विरोधक करत आहेत. मात्र, कारखाना सुरु करून शेतकऱ्यांना आम्ही मदत करत आहोत. माझ्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र दिले. पण, राज्यात पडलेल्या ओला दुष्काळाबाबतही एखादे पत्र द्यायला हवे होते,” असे चिमटा रोहित पवार राम शिंदेंना काढला आहे.
हेही वाचा : “उद्धव ठाकरे, भास्कर जाधवांचा बदला घेतल्याशिवाय…” नारायण राणेंचं नाव घेत भाजपा नेत्याचे मोठे विधान
रोहित पवार-राम शिंदे वाद चव्हाट्यावर
राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आणि भाजप नेते राम शिंदे यांच्यातील राजकीय वाद सर्वज्ञात आहे. रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात पराभव केला होता. बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून भाजपने राम शिंदे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. या कारखान्यावरून दोघांतील राजकीय वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.