उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. यानंतर बुधवारी पहिल्यांदाच अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं. आता ८३ वयोमानामुळे कुठेतरी थांबायला पाहिजे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त करत निवृत्तीचा सल्ला दिला.
तसेच, “कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही, हा माझा अपराध आहे का?” असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. ते ‘मुंबई तक’शी बोलत होते.
हेही वाचा : शरद पवार – राहुल गांधी यांच्यातल्या बैठकीत काय चर्चा झाली? सोनिया दुहान म्हणाल्या…
रोहित पवार म्हणाले, “कधी संधी मिळाली, तर प्रतिभाआजींना हा प्रश्न विचारला पाहिजे, अजित पवार असे बोलले आहेत; तुम्हाला काय वाटते. राहिला प्रश्न कुठे जन्मायचा. तर माझे आई-वडिल आणि आजोबाही राजकारणात नव्हते. तर, मी काय करायचं?”
“लोकनेता संपण्याची भीती”
“अजित पवार यांच्यात खूप मोठी क्षमता आहे. पण, भाजपाला कधीही लोकनेते चालत नाहीत. एकनाथ शिंदे यांचा एक वर्षात गेम होईल, असे वाटते आहे. भाजपाला त्यांच्या पक्षातील आणि बाहेरचेही लोकनेते आवडत नाहीत. ताकद कमी करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत असतो. त्यामुळे घडत असलेले एक लोकनेता भाजपामुळे संपण्याची भीती वाटते,” असं रोहित पवार यांनी म्हटलं.
हेही वाचा : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण, शरद पवारांचं तीन शब्दात उत्तर, म्हणाले…
“चार वर्षापासून भाजपाबरोबर जाण्याचं हे अनेकांच्या मनात”
“गेली तीन-चार वर्षे भाजपाशी संवाद सुरु होता, असं अजित पवारांनी सांगितलं. याचा अर्थ चार वर्षापासून भाजपाबरोबर जाण्याचं अनेकांच्या मनात होते. सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड आता झाली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे हे बाहेर जाण्याचं कारण होऊ शकत नाही,” असेही रोहित पवार म्हणाले.