राष्ट्रवादी काँग्रेस हा सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या चर्चेचा विषय ठरला आहे. याचं मुख्य कारण ठरलं आहे ते म्हणजे पक्षात अजित पवार यांच्या बंडामुळे पडलेली फूट. आपल्यासह चाळीसपेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. तसंच अध्यक्ष म्हणूनही त्यांचंच नाव निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे आज प्रफुल्ल पटेल यांनी ही माहिती दिली. राष्ट्रवादीतही शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत. बुधवारी पक्षाच्या दोन बैठका पार पडल्या. यामध्ये अजित पवारांनी तसंच छगन भुजबळांनी शरद पवार हे आपले गुरु आहेत, विठ्ठल आहेत असा उल्लेख केला. हाच संदर्भ घेत रोहित पवार यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात ओढ विठ्ठलाच्या भेटीची असं म्हटलं आहे. जे ट्वीट चर्चेत आहे.
काय म्हटलं आहे रोहित पवार यांनी?
ओढ ‘विठ्ठला’च्या भेटीची!!!
कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामान्य नागरीक यांची आज नाशिकला भेट झाली असता आम्ही सर्वजण आमच्या विठ्ठलाच्या अर्थात मा. पवार साहेबांच्या भेटीसाठी उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं… उद्याचा मा. पवार साहेबांचा दौरा. सकाळी ८ वाजता – मुंबईहून नाशिककडे प्रयाण.मुंबई-नाशिक मार्गाने १२ वाजता नाशिकमध्ये दुपारी १२ नंतर येवल्याकडे प्रयाण. असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे. सामान्य कार्यकर्त्यांनाही शरद पवार विठ्ठलासारखेच वाटत आहेत हेच रोहित पवार यांनी दाखवून दिलं आहे. तसंच रोहित पवार यांनीही शरद पवार यांचा उल्लेख विठ्ठल असाच केला आहे.
हे पण वाचा- “विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे”, भुजबळांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांचं प्रत्युत्तर; म्हणाले…
छगन भुजबळ यांनी बुधवारी केलेल्या भाषणात शरद पवार हे माझे विठ्ठल आहेत. पण त्यांनी बडव्यांना बाजूला केलं पाहिजे असं म्हणत वसंतदादा पाटील, बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात काय काय घडलं ते सांगितलं आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनीही शरद पवार यांचा उल्लेख विठ्ठल आणि पांडुरंग असा केला आहे. तसंच त्यांनी आता आपल्याला आशीर्वाद द्यावेत असंही म्हटलं आहे. त्यानंतर शरद पवार हे उद्या नाशिक आणि येवला दौऱ्यावर जात आहेत. त्या आधी रोहित पवारांनी केलेलं हे ट्वीट चांगलंच चर्चेत आहे. नाशिक आणि येवला हा छगन भुजबळांचा बालेकिल्ला मानला जातो. तिथे शरद पवार काय भाषण करणार? याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे.
२ जुलै च्या दिवशी अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसंच त्यांच्यासह नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या नेत्यांमध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीतल्या या फुटीनंतर शरद पवार हे सोमवारपासूनच (३ जुलै) मैदानात उतरले आहेत. सोमवारी त्यांनी कऱ्हाड या ठिकाणी जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. त्यानंतर आता शनिवारी ते नाशिक आणि येवला दौरा करणार आहेत.