महाविकास आघाडीमधील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक सल्ला दिलाय. पंढरपूरमध्ये रोहित पवार प्रसारमाध्यमांशी चर्चा करत असतानाच राऊत यांच्याकडून पत्रकार परिषदेमध्ये भाजपा नेते किरीट सोमय्यांबद्दल बोलताना अपशब्द वापरल्याच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना रोहित यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे.
“सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना शब्द हे जपून आणि मोजून वापरले पाहिजेत,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवारांचे नातू असणाऱ्या रोहित यांनी संजय राऊत यांना हा सल्ला दिला आहे. राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्येच असंसदीय आणि खालच्या भाषेत किरीट सोमय्यांवर टिका केली होती. राऊत यांच्या या शिवराळ भाषेविषयी सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. याच नाराजी व्यक्त करणाऱ्यांमध्ये रोहित पवारांचाही समावेश झालाय.
कारवाई केल्यानंतर त्यांची भावना आपण समजू शकतो. भाजपा सूड भावनेने कारवाई करत आहे. त्यामुळे अशा पद्धतीने भावना व्यक्त केली आहे. मात्र बोलताना सर्वच राजकीय नेत्यांनी मोजून आणि मोपून बोललं पाहिजे, असा सल्ला ही आमदार पवार यांनी दिला आहे.
“एखाद्याच्या राहत्या घरी, जिथं तुमचं कुटुंब राहतं तिथं राजकीय हेतून कारवाई झाली तर माणूस भावनिक होत असतो. एखादी व्यक्ती खूपच जास्त भावनिक झाली तर कधी कधी शब्द वेगळ्या अर्थाने निघू शकतात. अशा ठिकाणी आपण भावना समजून घेतल्या पाहिजेत. शब्द सर्वांनीच जपून वापरले पाहिजेत. अशा ठिकाणी भावना अधिक महत्वाच्या असतात,” असं रोहित पवार म्हणाले. तसेच पुढे बोलताना, “एखाद्या कुटुंबावर कारवाई होते तेव्हा त्या कुटुंबातील सदस्य हे राजकीय लोक नसतात. त्यांना त्या गोष्टी कळतही नसतात. लोक घाबरतात कुठेतरी टेन्शन घेतात. अशाप्रकारचं नवीन प्रकारचं राजकारण सुरु झाल्याचं सध्या दिसत आहेत. महाराष्ट्रात असं यापूर्वी नव्हतं. महाराष्ट्रातील लोकांना हे सगळं समजतंय. दिल्लीपुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणार नाही असं मी महाराष्ट्रातील लोकांच्यावतीने या ठिकाणी सांगतो,” असंही म्हणाले.
राऊत नेमकं काय म्हणालेले?
संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांसंदर्भात बोलताना अपशब्दांचा वापर केला होता. आयएनएस विक्रांतसंदर्भात सोमय्या यांनी केलेल्या ५७ लाखांच्या कथित घोटाळा प्रकरणावरुन दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. संजय राऊत यांनी सोमय्यांवर आरोप केल्यानंतर सोमय्यांनी राऊतांना उत्तर देताना संजय राऊतांचा हा नवीन पराक्रम असल्याचं वक्तव्य केलं होतं. याचसंदर्भात राऊतांना पत्रकार परिषदेत विचालं असता त्यांनी येड** असा आक्षेपार्ह शब्द वापरला. “येड** आहे तो, हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय. महाराष्ट्रात अशा चु** लोकांना स्थान नाही. महाराष्ट्राला लागलेली ही कीड असून ही कीड संजय राऊत, शिवसेना संपवणार. हा चु** पराक्रम काय सांगतो मला,” अशा शब्दांत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला.
“हे सगळे महाराष्ट्रद्रोही, देशद्रोही आयएनएस विक्रांतच्या नावाखाली कोट्यवधी जमा करतात आणि भ्रष्टाचार बाहेर काढल्यानंतर पराक्रम म्हणता. हा देशद्रोह आहे. देशभावनाच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार भाजपाने केला आहे,” असा आरोप संजय राऊतांनी केली. देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत अटक झाली पाहिजे अशी मागणी संजय राऊतांनी केली.