राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात असलेले आमदार निलेश लंके हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील तसे संकेत दिले होते. त्याप्रमाणे निलेश लंके पुण्यात शरद पवारांना भेटले. दोघांनी एकत्र पत्रकार परिषदही घेतली. परंतु, निवडणूक लढवण्याबाबत किंवा शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबत लंके यांनी भाष्य केलं नाही. मात्र तुमच्या हातात घड्याळ आहे की तुतारी? असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “शरद पवार सांगतील तो आदेश.” त्यामुळे लंके शरद पवार गटात परतणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. तसेच अजित पवार गटातील इतर आमदारही नाराज असून ते स्वगृही परत येतील असा दावा शरद पवार गटातील नेते करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील अनेक आमदार शरद पवार गटात परत येण्यास इच्छूक आहेत, असं वक्तव्य शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. लोकसभेवेळीच भारतीय जनता पार्टीचा अजित पवार गटावर मोठा दबाव आहे. असं असताना भाजपावाले विधानसभेला काय करतील? असा खोचक प्रश्नदेखील रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

रोहित पवार म्हणाले, अजित पवार गट जागावाटपात स्वतः निर्णय घेतो की नाही हे मला सांगता येणार नाही. अजित पवारांच्या पक्षातील आमदार चिंतेत आहेत. तसेच अनेकजण परत येण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या गटातील नेत्यांचं सोडा, कारण त्यांच्यावर आमच्या पक्षाने कारवाई केली आहे. त्यामुळे ते परत येऊ शकणार नाहीत आणि आले तरी शरद पवार त्यांना पक्षात घेणार नाहीत. त्यांच्या आमदारांबद्दल बोलायचं झाल्यास काहीजण परतण्यास इच्छूक आहेत. कारण त्या आमदारांना वाटतंय की, आत्ता लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाचा इतका दबाव असेल तर विधानसभेला तर ते आपल्याला भाव पण देणार नाहीत. त्यामुळे इथे राहून आपलं नुकसान का करावं? हाच विचार करून बरेच आमदार शरद पवारांकडे येतील. आता त्याची सुरुवात झाली आहे.

हे ही वाचा >> “इंडियाच्या सभेत उद्धव ठाकरेंना भाषा बदलावी लागली”, ‘त्या’ कृतीवरून मुनगंटीवारांचा टोला

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा महायुतीत अजित पवार गटाला महाराष्ट्रातील केवळ तीन ते चार जागा सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय. दुसऱ्या बाजूला शिवसेनेचा शिंदे गट १८ पेक्षा अधिक जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करत आहे. तर उरलेल्या २६ जागा भाजपाला मिळणार असल्याचं बोललं जात आहे. भाजपाने महाराष्ट्रातील २० जागांवरील त्यांचे उमेदवार आधीच जाहीर केले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar says bjp pressures ajit pawar ncp in lok sabha fear among mlas can return asc
Show comments