“आम्ही आयुष्यभर राष्ट्रवादीच्या विरोधात लढलो आणि आता राष्ट्रवादीच्या चिन्हाला पाठिंबा देणार आहोत, म्हणून काही लोक आमच्यावर टीका करतात. पण राजकारणात तराजू लावून निर्णय घ्यायचे असतात. आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त महत्त्वाचा वाटतो”, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (१८ मार्च) बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत केलं होतं. पाटील म्हणाले, २०१९ साली शरद पवारांमुळेच आमचं सरकार गेलं. जनतेनं आमचे १६१ आमदार निवडून दिले होते. पण शरद पवारांनी शिवसेनेला बाजूला करून सरकार स्थापन केलं. त्यात आमचं नाही मात्र महाराष्ट्रातल्या जनतेचं खूप नुकसान झालं. त्या ३३ महिन्यात महाराष्ट्राचा काहीही विकास झाला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रकातं पाटलांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे. रोहित पवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, गेली सहा दशकं महाराष्ट्राची व देशाची सेवा करणाऱ्या शरद पवार यांचा पराभव करणं हे कपटी भाजपाचं लक्ष्य असल्याचं चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट झालं, पण त्यासाठी बंदूक मात्र अजितदादांच्या खांद्यावरून चालवायचीय… ‘वापरा आणि फेकून द्या’ ही भाजपाची निती जगजाहीर आहे… त्यामुळं ज्यांनी आपल्याला या स्थानापर्यंत पोहोचवलं त्या शरद पवारांच्या पराभवासाठी आपला वापर करुन द्यायचा की नाही, हे आता अजित पवार यांनीच ठरवायचंय आणि त्यांना ठरवता येत नसेल तर त्यांच्याबरोबर असलेल्या, परंतु शरद पवारांवर प्रेम करणाऱ्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी ते ठरवावं! शिवाय शरद पवार ही व्यक्ती नाही तर विचार आहे, तो संपवणं भाजपला कदापि शक्य नाही, हेही भाजपाने लक्षात ठेवावं!

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

महाविकास आघाडीच्या ३३ महिन्यांच्या काळात महाराष्ट्राचं नुकसान झालं, असे सांगताना चंद्रकांत पाटील म्हणाले, शरद पवार यांनी आम्ही तुमच्याबरोबर सरकार स्थापन करतोय असं सांगून संपूर्ण जग ज्यांना मानतं, त्या माझ्या दोन नेत्यांना (नरेंद्र मोदी – अमित शाह) झुलवत ठेवलं होतं. आज मला शरद पवारांचा हिशेब चुकता करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे अजित पवारांना बरोबर का घेतलं? असे प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचे नाहीत. मला फक्त शरद पवारांचा पराभव हवा आहे.

हे ही वाचा >> ठाकरे-पवारांना डावलून प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला नवा प्रस्ताव, खरगेंना म्हणाले, “त्या दोन पक्षांवर…”

दरम्यान, बारामती मतदारसंघात सध्या महायुतीच्या नेत्यांमध्येच वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे गटाच्या विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात शड्डू ठोका आहे. तर हर्षवर्धन पाटील सावध पवित्रा घेत आहेत. याबाबत चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे औषध सर्वांना लागू पडतं. गेल्या दहा वर्षांमधला फडणवीस यांचा इतिहास काढून बघा. ते या वादावर लवकरच तोडगा काढतील. हर्षवर्धन पाटील असो किंवा इतर कोणीही असो पुढच्या आठवड्यात सर्व नेते बारामतीत एकत्र फिरताना दिसतील.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar says bjp wants to attack on sharad pawar with help ho ajit pawar asc