“नागालँडप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसने एनडीएबरोबर यावं. पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकवेळा शरद पवारांचं कौतुक केलं आहे. पवारांनी एनडीएसोबत यावं”, असं आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं होतं. आठवले यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले की, “रामदास आठवले यांचं वक्तव्य हास्यस्पद आहे.”

रोहित पवार म्हणाले, “एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, शिर्डी हा लोकसभेचा मतदार संघ शिंदे गटाकडे आहे. सदाशिव लोखंडे हे तिथले खासदार आहेत. परंतु या मतदार संघातून रामदास आठवले यांनी लोकसभेची निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदार संघात भाजपाचे अनेक केंद्रीय मंत्री मोर्चेबांधणी करत आहेत.”

“भाजपा-मित्रपक्ष शिंदे गटाची ताकद संपवत आहेत”

आमदार पवार म्हणाले की, “एकीकडे शिर्डीत रामदास आठवले निवडणुकीला उभे राहतील, अशी केवळ चर्चाच नाहीत तर त्यांनी स्वतःच तसं सांगितलं आहे. तर दुसऱ्या बाजुला श्रीकांत शिंदेंच्या मतदार संघात भाजपाचे केंद्रीय मंत्री प्रयत्न करत आहे. यावरून असं दिसतंय की, शिंदे गटाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न भाजपा आणि मित्र पक्षांकडून सुरू आहे.”

हे ही वाचा >> “पुन्हा म्हणू नका…”; संजय शिरसाटांचं उद्धव ठाकरेंना आव्हान, म्हणाले, “ज्याने खोके घेतले…”

रोहित पवार म्हणाले की, “आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल केलेल्या वक्तव्याकडे न पाहता त्यांच्या कृतीकडे सर्वांनी पाहावं. कारण येत्या काळात भाजपा आणि मित्रपक्ष शिंदे गटाच्या खासदारांच्या जागांवर हक्क सांगताना दिसतील.”

Story img Loader