सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटक केली होती. मागील जवळपास १७ महिने नवाब मलिक हे ईडीच्या कस्टडीमध्ये होते. दरम्यान, वारंवार अर्ज करूनही मलिक यांना जामीन मिळत नव्हता. अखेर दोन आठवड्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना प्रकृतीच्या कारणास्तव दोन महिन्यांचा अंतरिम जामीन दिला आहे. नवाब मलिक तुरुंगात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. ते तुरुंगात जाण्यापूर्वी राष्ट्रवादी पक्ष एकसंघ होता. आता या पक्षात दोन गट पडले आहेत.
अजित पवार यांनी पक्षातील अनेक आमदार-खासदारांना बरोबर घेत वेगळा गट बनवला आहे. अजित पवारांचा हा गट भाजपा-शिवसेनेसह (शिंदे गट) सत्तेत सहभागी झाला आहे. तर काही आमदार आणि नेते हे अद्याप शरद पवार यांच्याबरोबर आहेत. शरद पवारांचा गट विरोधात (महाविकास आघाडीमध्ये) आहे. त्यामुळे आता तुरुंगातून बाहेर पडलेले नवाब मलिक कोणत्या गटात जाणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील नेते हे सातत्याने नवाब मलिक यांची भेट घेत आहेत. शरद पवार यांच्या गटातील आमदार रोहित पवार यांनी नुकतीच नवाब मलिक यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी पत्रकारांनी पवार यांना नवाब मलिकांच्या भेटीत कोणती राजकीय चर्चा झाली असा प्रश्न विचारला. यावर रोहित पवार म्हणाले, नवाब मलिक आणि आमचं व्यक्तिगत नातं आहे. ते अनेक वर्षांपासून शरद पवार यांच्याबरोबर आहेत. आज त्यांची तब्येत बरी नाही. सध्या त्यांची परिस्थिती अडचणीची आहे. त्यामुळे आम्ही केवळ त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली. तिथे कुठलीही राजकीय चर्चा केली नाही. केवळ त्यांच्या आरोग्यासंदर्भात बोललो.
आमदार रोहित पवार म्हणाले, अशा परिस्थितीत केवळ माणूसकी महत्त्वाची असते. नवाब मलिक हे सध्या आजारी आहेत. या आजारपणात आरोग्याची काळजी घेणं हेच सर्वात महत्त्वाचं असतं. आमच्या सगळ्यांची भूमिका हीच आहे. कुठलाही पदाधिकारी, एखादा कार्यकर्ता आजारी असेल तर राजकारण न करता माणूसकीने त्याकडे पाहायला हवं, ही आम्हा सर्वांची भूमिका आहे.