भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंसंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरुन भाजपाचे नेते प्रविण दरेकर यांनी नाराजी व्यक्त करत टीका केलीय. मात्र दरेकर यांनी केलेल्या टीकेवरुन रोहित पवार यांनी अवघ्या काही तासांमध्ये विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेत्यांवर टीकास्त्र सोडत, “दरेकर साहेब आपण पवार कुटुंबाची चिंता करू नये,” असा सल्ला दिलाय.
रोहित पवार यांनी गोपीनाथ मुंडेंसंदर्भात भाष्य करताना, “गोपीनाथ मुंडे जर आज हयात असते तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते,” असं मत व्यक्त केलं होतं. यावरुनच शुक्रवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना दरेकर यांनी रोहित पवारांना लक्ष्य केलं. “गोपीनाथ मुंडे हयात असते तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते असं बोलण्याऐवजी रोहित पवारांनी स्वत:च्या घरातील परिस्थिती पाहावी,” असा खोचक सल्ला दरेकरांनी रोहित पवारांना दिलेला. तसेच पुढे बोलताना, “रोहित पवारांनी आधी त्यांच्या घरातील अजित पवार, सुप्रिया सुळे की ते स्वत: मुख्यमंत्री होणार, यावर एकमत करावं आणि मग हयात नसलेल्यांबद्दल बोलावं,” अशा शब्दांमध्ये रोहित पवारांवर टीका केली.
प्रवीण दरेकांनी केलेल्या या टीकेवरुन रोहित पवार यांनी शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास तीन ट्विट करत उत्तर दिलंय. “काही राजकीय नेत्यांचं कर्तृत्व राजकारणाच्या पलिकडं असतं तसंच कर्तृत्व मुंडे साहेबांचं असल्याने ते लोकनेते होते. त्यांनी अनेक कार्यकर्ते आणि नेते घडवले. म्हणून सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्ते त्यांच्याकडं मुख्यमंत्री म्हणूनच बघायचे,” असं रोहित यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटलंय. पुढल्या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी आपल्या वक्तव्याचं समर्थन करताना स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणतात, “त्यामुळं मुंडे साहेबांविषयी मी व्यक्त केलेल्या भावनांचं दरेकर आपण स्वागत करायला हवं होतं. परंतु तसं न करता उलट आपण माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यावरच टीका केली हे आश्चर्यकारक आहे. कदाचित मुंडे साहेबांच्या निधनानंतर आपण भाजपामध्ये आल्याने आपणास मुंडे साहेब समजले नसावेत,” असा टोला रोहित पवारांनी लगावला.
शेवटच्या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी दरेकरांना पवारांच्या कुटुंबाची चिंता करु नका असं म्हटलंय. “आणि हो… पवार कुटुंब म्हणून आम्ही एकत्रितपणे राजकीय दिशा ठरवत असतो आणि आमचं ठरलंय. त्यामुळं दरेकर आपण पवार कुटुंबाची चिंता करू नये! उलट राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल हे आपण मान्य केलं, याबद्दल आपले आभार!,” असं रोहित पवार म्हणालेत.
दरम्यान, रोहित पवारांवर निशाणा साधताना दरेकरांनी त्यांना अजित पवारांचा संदर्भही दिला होता. “रोहित पवार अजून लहान आहेत. उगीच वाद निर्माण करु नये, असं अजित पवार नेमही सांगतात. ते त्यांनी लक्षात घ्यायला हवं,” असंही म्हटलं होतं. याच सर्व टीकेला आता रोहित पवारांनी उत्तर दिलंय.