राज्यात राष्ट्रवादी पक्षामध्ये बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपाला साथ देत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतील आठ आमदार असून या आमदारांनी मंत्रिपदाचीही शपथ घेतली आहे. दरम्यान, त्यांच्यासोबत अजून बरेच आमदार असल्याचाही दावा केला आहे. परंतु, किती आमदारांचा पाठिंबा आहे, याबाबत अधिकृत खुलासा झालेला नाही. दरम्यान, राष्ट्रवादीत झालेली ही बंडखोरी म्हणजे ऑपरेशन लोटसचा भाग असल्याची टीका महाविकास आघाडीतील नेत्यांनी केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते रोहित पवार यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये आर.आर.आबा यांचं भाषण असून दहा वर्षांपूर्वी भाजपाला आर.आर.आबांनी काही प्रश्न विचारले होते, त्याची उत्तरे अद्यापही मिळाले नसल्याचे रोहित पवारांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
२५ वर्षांची भाजपासोबतची युती तोडून शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत २०१९ मध्ये महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. त्यामुळे भाजपाने महाविकास आघाडीविरोधात मोहिम उघडली होती. यातूनच एकनाथ शिंदे यांचं बंड झालं. भाजपा-शिवसेनेची नैसर्गिक युती होती, असं सांगून शिंदे गटातील आमदारांनी अजित पवारांवर आरोप करत महाविकास आघाडीतून काढता पाय घेतला. परिणामी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) संख्याबळ कमी झाल्याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले.
शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवारांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. विविध मुद्द्यांवर सरकारला हेरण्यात आले. हिवाळी अधिवेशन, अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवारांनी विरोधी पक्षनेत्याची चोख भूमिका बजावली. मात्र, पावसाळी अधिवेशाच्या आधीच विरोधी बाकावर असलेले अजित पवार आता थेट सत्तेत जाऊन बसले आहेत. अजित पवार आणि त्यांच्यासह गेलेल्या अनेक आमदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने भाजपाने त्यांच्यावर दबाव आणला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून केली जातेय. म्हणून अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड करून सत्तेत सहभाग घेतला आहे. राज्यात घडणाऱ्या या सर्व पार्श्वभूमीर आर. आर. पाटील यांचा व्हिडीओ रोहित पवार यांनी शेअर केला आहे.
आर. आर. पाटील यांच्या व्हिडीओमध्ये काय आहे?
रोहित पवारांनी शेअर केलेला व्हिडीओ हा दहा वर्षांपूर्वीचा असल्याचं म्हटलं आहे. त्यात आर.आर. पाटील भाजपावर टीकास्त्र डागत आहेत. “ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते, आज त्यांना सन्मानाने भाजपामध्ये घेतलं जातंय. भाजपाला मी विचारू इच्छितो की तुम्ही आजपर्यंत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, असं कोणतं तीर्थ यांच्यावर शिंपडलं अन् हे पवित्र झाले? राज्यामध्ये आयाराम गयाराम संस्कृतीला खत घालण्याचं काम भाजपाने केलं आहे. हा आजपर्यंत म्हणजे साधुसंतांचा पक्ष असा दावा भाजपाचे लोक करत होते. अलिकडच्या काळात भाजपाचा पक्ष साधुसंतांचा पक्ष नाही, संधीसांधूंचा पक्ष आहे. आज एवढ्या लोकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. दाल मे काला असं म्हटलं जातं, पण आता काले मे दाल अशी भाजपाची अवस्था झाली आहे.”
दहा वर्षांनंतरही आर. आर. पाटलांचं हे भाषण राज्याच्या राजकीय घडामोडींवर समर्पक असल्याची भावना शरद पवार गटाने व्यक्त आहे.