Rohit Pawar vs Ashok Chavan & Ram Shinde : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व भारतीय जनता पार्टीचे खासदार (राज्यसभा) अशोक चव्हाण यांनी रविवारी (१३ एप्रिल) नांदेडमध्ये राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला. यासाठी आयोजित सोहळ्याप्रसंगी केलेल्या भाषणात बोलताना चव्हाण यांनी राम शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. तसेच राम शिंदे यांना कर्जत-जामखेड मतदारसंघात सलग दोन वेळा पराभूत करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
अशोक चव्हाण म्हणाले, “राम शिंदे हे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात. हा खूप अवघड मतदारसंघ आहे. मध्यंतरी माझा कर्जत-जामखेडला जाण्याचा योग आला. अर्थात, त्यावेळी मी एका दुसऱ्या पक्षात (काँग्रेस) होतो. रोहित पवारने (स्थानिक आमदार) मला तिकडे बोलावलं होतं. मग मी देखील चक्कर मारायला तिकडे गेलो होतो. परंतु, तिथे गेल्यावर मला आलेला अनुभव मी इथे सर्वांना सांगितला पाहिजे. तिथे लोक माझ्याकडे येऊन माझ्या कानात सांगत होते की या ठिकाणी खरा माणूस राम शिंदे आहे. म्हणजेच जनमाणसाचा राम शिंदेंना पाठिंबा आहे.
अशोक चव्हाणांची राम शिंदेंवर स्तुतीसुमने
भाजपा नेते अशोक चव्हाण म्हणाले, “राम शिंदे हे आज खूप महत्त्वाच्या पदावर आहेत. ते अशा पदावर आहेत जिथून ते सरकारला देखील आदेश देऊ शकतात आणि सरकारला त्यांचा आदेश पाळावा लागेल. सरकारला सभापतींचा आदेश मानावा लागतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम शिंदे यांना संधी देऊन त्या पदावर नेमणूक केली आहे. या कर्तृत्वान माणसाला वरिष्ठ सभागृहात बसवलं आहे.”
अशोक चव्हाणांच्या वक्तव्याने रोहित पवार दुःखी
दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या या टीकेला आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे. रोहित पवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की ज्येष्ठ नेत्याने भूमिका बदलली, इतक्या लवकर निष्ठा बदलली तर आमच्यासारख्या नव्या पोरांना खूप दुःख होतं.
“अशोक चव्हणांसारख्या नेत्यांच्या भूमिका बदलतात तेव्हा वाईट वाटतं”
रोहित पवार यांनी म्हटलं आहे की अशोक चव्हाणजी, विचारधारेशी निष्ठा नसेल तर राजकीय अनुभवाला काहीच अर्थ राहत नाही, ही पुरोगामी विचारधारा मानणाऱ्या आमच्यासारख्या नव्या पोरांची आपल्यासारख्या ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांकडे तक्रार आहे. बाकी, आपल्याबद्दल कायमच आदर आहे, होता आणि राहील. परंतु, अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या भूमिका आणि निष्ठा एवढ्या लवकर बदलतात हे बघून आमच्यासारख्या नव्या पोरांना, कार्यकर्त्यांना दुःख होतं, बाकी काही नाही!