राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रांबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला होता. त्यावर शरद पवारांनी “कोण मिश्रा? मी त्यांना ओळखत नाही”, असा टोला लगावला होता. त्याला बुधवारी मिश्रा यांनी उत्तर दिलं. “शरद पवार यांना मीसुद्धा ओळखत नाही. ५ ते ६ खासदार असलेल्या पक्षाला आम्ही गृहीत धरत नाही”, असा टोला अजय मिश्रा यांनी लगावला. तसेच शरद पवार यांनी माझ्या मतदारसंघात येऊन माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी, असं आवाहनही मिश्रा यांनी दिलं.
दरम्यान, मिश्रा यांच्या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मिश्रा यांना ट्विटरवरून उत्तर दिलं आहे. रोहित पवारांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, ‘लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणाऱ्या मस्तवाल मुलाचा बाप’, अशी ‘ओळख’ करून देण्याची वेळ आदरणीय पवार साहेबांवर कधी आली नाही, हे सत्ता डोक्यात भिनलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांना राज्यातल्या एखाद्या भाजप नेत्याने सांगण्याची गरज आहे.
रोहित पवारांनी लिहिलं आहे की, आपल्या मुलाने केलेल्या ‘कर्तृत्वावर’ वडील म्हणून राजीनामा दिला असता तर त्यांना (मिश्रा) गांभीर्याने घेतलं असतं. राहिला प्रश्न त्यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा, तर लढत ही तुल्यबळांच्यात होत असते. आदरणीय पवार साहेबांची राजकीय कारकीर्द मिश्रा यांच्या वयापेक्षा जास्त आहे, त्यांनी साहेबांविरोधात निवडणूक लढवण्याचं आव्हान देणं हे निव्वळ हास्यास्पद आहे. त्यांच्या वक्तव्याची बातमी झाली यातच त्यांनी समाधान मानावं.
हे ही वाचा >> ठाकरे गटाच्या सभेत रिकाम्या खुर्च्या पाहून संजय राऊतांनी पदाधिकाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “प्रत्येकाने…”
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील तिकोनिया या ठिकाणी झालेल्या शेतकऱ्यांच्या अपघातप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर अलिकडेच आरोप निश्चित करण्यात आला आहे. आशिष मिश्रा याच्यासोबत एकूण १४ जणांवर हा आरोप निश्चित करण्यात आला आहे. देशात शेतकरी आंदोलन सुरू असताना उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी या ठिकाणी ३ ऑक्टोबर २०२१ रोजी अजय मिश्रा याच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडले होतं. याच घटनेवरून रोहित पवारानी मिश्रा यांना टोला लगावला आहे.