मंगळवारी देहूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेल्या संत तुकाराम यांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी न दिल्याच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केलीय. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावरुन उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर आता त्यांच्या आमदार असणाऱ्या सुप्रिया सुळेंच्या भाच्यानेही अजित पवारांना बोलू न दिल्याच्या मुद्द्यावरुन भाजपावर कठोर शब्दांमध्ये टीका केलीय.
नक्की वाचा >> अजित पवारांना देहूमधील कार्यक्रमात बोलू न दिल्याने संजय राऊत संतापून म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्राला…”
घडलं काय आणि सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान असून हा प्रकार गंभीर आणि वेदना देणारा आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांना भाषणासाठी संधी देणे हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण, अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. या कार्यक्रमात त्यांना भाषण करू देण्याविषयीचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता, पण तो नामंजूर करण्यात आला. अजित पवार यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही.
रोहित पवार काय म्हणाले?
या प्रकरणावर रोहित पवार यांनी ट्विटरवरुन आपलं मत व्यक्त केलं आहे. “छत्रपतींचा तसेच क्रांतीज्योतींचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना पंतप्रधान साहेबांसमोर खडे बोल सुनावणाऱ्या अजितदादांच्या स्पष्टवक्तेपणामुळे भाजपची नक्कीच अडचण होत असणार म्हणून कदाचित भाजपने आजच्या कार्यक्रमात अजित पवारांना बोलू दिले नाही,” असं रोहित यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये रोहित यांनी, “वारकऱ्यांच्या कार्यक्रमात सर्व भेद, द्वेष, अहंकार विसरून सहभागी व्हायचे असते. परंतु अहंकाराच्या आहारी गेलेल्या प्रदेश भाजपच्या नेत्यांकडून ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे. अहंकाराबद्दल संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात अहंकार हा आत्मनाश घडवितो, माणसाला सत्यापर्यंत पोचू देत नाही,” असं म्हणत महाराष्ट्र भाजपावर टीका केलीय.
तिसऱ्या ट्विटमध्ये रोहित यांनी, “अहंकारी मनुष्य ‘आपण मोठे आहोत’ अशी भावना डोक्यात धरून गुरगुरत राहतो आणि असंच काहीसं आज प्रदेश भाजपा नेत्यांचं झालं असावं. असो संत तुकोबारायांच्या दर्शनाने नक्कीच सर्वांना सद्बुद्धी प्राप्त होईल, अशी अपेक्षा,” असं म्हणत भाजपाला लक्ष्य केलंय.
आशिष शेलार म्हणतात प्रत्येक गोष्टीत राजकारण नको
याच संदर्भात बोलताना आशिष शेलार यांनी, “नरेंद्र मोदींनी मोठ्या मनाने आणि दिलखुलासपणे अजित पवारांना तुम्ही भाषण करा असं सांगितलं. त्यावर अजित पवार काय बोलले हे त्यांनाच माहिती. ही सुद्धा सत्य परिस्थिती आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारणाचा मिठाचा खडा टाकणे योग्य नाही. सुप्रिया सुळेंनी थोडी माहिती घेतली असती तर हे वक्तव्य केलं नसतं असं माझं मत आहे,” असं पत्रकारांशी बोलताना सांगितलं.