कसबा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदार संघातील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन्ही जागा रिक्त होत्या. या जागांवर आता पोटनिवडणूक होत आहे. महाराष्ट्रात एखाद्या आमदाराचं निधन झालं तर त्यांच्या मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत संबंधित आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनाच उमेदवारी देण्याची परंपरा आहे. त्यानुसार चिंचवडच्या पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली. परंतु कसबा पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला भाजपाने उमेदवारी दिली नाही.

भाजपाने कसबा पेठ मतदार संघात हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. यावरून आता वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. कसबा येथील उमेदवारीबाबत विचारले असता पुण्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले की, “उपमुख्यमंत्री देवेंद्र फंडणवीस यांनी आणि मी टिळक वाड्यात जाऊन शैलेंद्र टिळक आणि कुणाल टिळक यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर आम्ही उमेदवारीबाबत निर्णय घेतला.”

चंद्रकांत पाटील म्हणाले की, “टिळकांच्या घरात महाविकास आघाडीने उमेदवारी दिली तर ही निवडणूक आम्ही बिनविरोध करू.” याबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना विचारले असता, रोहित पवार म्हणाले की, “चंद्रकांत दादाचं हे विधान हास्यास्पद आहे.”

हे ही वाचा >> चिंचवड : “दुःख उराशी बाळगून आम्ही पोटनिवडणूक लढवत आहोत”, लक्ष्मण जगताप यांच्या बंधूंची प्रतिक्रिया; म्हणाले, “आमचा विजय..”

“…म्हणून भाजपाने ओबीसी समीकरण जुळवलं”

रोहित पवार म्हणाले की, स्वतः चंद्रकांत पाटील यांनी टिळक कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्याची मागणी केली होती. परंतु भारतीय जनता पार्टीने टिळक कुटुंबाविरोधात उमेदवार दिला आहे. काही तज्ज्ञांनी असं मत व्यक्त केलं आहे की, भारतीय जनता पार्टीने त्यांच्या पक्षातील ओबीसी नेत्यांची ताकद कमी केली होती. त्यामुळे आता त्यांना आणि मतदारांना खूश करण्यासाठी भाजपाने टिळक कुटुंबाला डावलून ओबीसी उमेदवाराला संधी दिली आहे. परंतु टिळक कुटुंबियांना संधी देण्याची जबाबदारी भाजपाची आहे.

Story img Loader