अवघ्या दोन महिन्यांवर लोकसभा निवडणुका होऊ घातल्या असताना त्याअनुषंगाने राजकीय वातावरण तापू लागल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय पातळीवर राजकीय चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्रातही जागावाटप व उमेदवार निश्चितीवरून बैठका होताना पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली असताना पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामतीमध्येच पवार विरुद्ध पवार असा थेट सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अजित पवारांच्या गटाकडून सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात असताना त्यावर आता रोहित पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बारामतीमधून सुप्रिया सुळे गेल्या अनेक वर्षांपासू लोकसभेवर निवडून जात आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे आता बारामतीमध्ये नेमकं काय घडणार? अशी चर्चा चालू आहे. सुनेत्रा पवारांचे बॅनर्स बारामतीमध्ये झळकल्यापासून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. सुप्रिया सुळेंनीही यासंदर्भात टीका केली असताना त्यावर रोहित पवारांनी आज विधानभवनाबाहेर माध्यमांशी बोलताना आपली भूमिका मांडली.

बारामतीत उमेदवार बदलणार?

रोहित पवारांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी अजित पवार गटाकडून उमेदवार बदलला जाण्याची शक्यता व्यक्त केली. “एकदा त्यांचा उमेदवार जाहीर होऊ द्या. त्यानंतर यावर स्पष्टपणे बोलता येईल. काही लोक अशीही चर्चा करत आहेत की समोरून जो आपल्याला अपेक्षित उमेदवार आहे, तो बदललाही जाईल”, असं रोहित पवार म्हणाले.

बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार दोन लाख मतांनी निवडून येतील – संजय काकडे

“भाजपाला जे हवं होतं, ते त्यांनी केलेलं आहे. भाजपानं अजित पवारांचा वापर केलेला आहे. गेल्या अनेक वर्षांत शरद पवार व पवार कुटुंबीयांनी महाराष्ट्रात पुरोगामी विचार टिकावा यासाठी संघर्ष केला. त्यामुळे भाजपाला अनेकदा अडचणीत यावं लागलं. आता पवार विरुद्ध पवार वाद केल्यामुळे भाजपाला जास्त फायदा होतोय. भाजपाला जे हवं ते आधीच झालेलं आहे. पवार विरुद्ध पवार संघर्ष सुरू झालेला आहे. पण सामान्य मतदार शरद पवारांच्या बाजूने निकाल देतील असा मला विश्वास आहे”, असा विश्वासही रोहित पवारांनी यावेळी व्यक्त केला.

“अजित पवार गटाच्या कोणत्याही उमेदवाराविरोधात लढणारच”

“अजित पवार त्यांच्या उमेदवाराबाबत निर्णय घेतील. चोरलेला का असेना, त्यांचा वेगळा पक्ष आहे. पण कुटुंब म्हणून विचाराल तर पवार विरुद्ध पवार असं होऊ नये. मात्र त्यांच्याकडून जो कुठला उमेदवार दिला जाईल, त्याच्याविरोधा लढणं भाग आहे. आम्ही मनापासून लढणार”, असंही रोहित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.

शरद पवारांवरील टीकेला उत्तर

दरम्यान, जरांगे पाटील यांच्यामागे शरद पवार असल्याचे दावे केले जात असताना त्यावर रोहित पवारांनी तोंडसुख घेतलं. “गेल्या ५० वर्षांत शरद पवारांविरोधात बोलल्याशिवाय भाजपाचं कधीही राजकीय दृष्टीने भलं झालेलं नाही. त्यासाठी वेगळं वातावरण निर्माण करण्यासाठी भाजपाचे नेते तसं बोलत असावेत. पण एकच सांगतो, कुणाचा करेक्ट कार्यक्र होईल, हे मी इथे सांगणार नाही. पण सामान्य लोक लोकशाहीच्या माध्यमातून येत्या निवडणुकीत भाजपा व त्यांच्या मित्रपक्षांचा करेक्ट कार्यक्रम करतील असं आम्हाला वाटतं”, असं रोहित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar slams bjp targeting ajit pawar for baramati loksabha election pmw