काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी केली. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचं विधान राज्यपालांनी केलं आहे. मात्र यावरुन आता वाद निर्माण झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी व्यक्त करताना रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे मागील काही दिवसांपासून सावरकरांसंदर्भातील प्रकरणावरुन आंदोलन करणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटालाही टोला लगावला आहे.
नक्की वाचा >> “या राज्यपालांना राज्याच्या बाहेर पाठवा, इतका घाणेरडा…”; भगतसिंह कोश्यारींसंदर्भात संभाजीराजे छत्रपतींची मागणी
काय घडलं?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज मराठवाडा विद्यापीठाकडून मानद डि. लिट पदवी देण्यात आली. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कुलपती म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी आणि शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. इतकंच नव्हे, तर शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचं विधान राज्यपालांनी केलं. त्यांच्या या विधानावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. सर्वच स्तरातून राज्यपालांच्या या विधानावर आक्षेप घेतला जात आहे.
“आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
कोश्यारी यांच्या या विधानानंतर रोहित पवार यांनी ट्वीटरवरुन त्यांचा फोटो पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे. “राज्यपाल महोदय, छत्रपतींची महती कळावी एवढी बौद्धिक उंची आपल्याकडे नसावी म्हणूनच वारंवार आपण छत्रपतींचा अवमान करत आहात. पात्रता नसलेल्या अशा माणसाकडून आता दिलगिरीचीही अपेक्षा नाही,” असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे. तर भाजपा आणि शिंदे गटावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधताना, “विशेष म्हणजे मागील दोन दिवस पेटून उठलेले आज मात्र नक्कीच पेटणार नाहीत, याची खंत वाटते,” असंही रोहित पवार म्हणालेत.
संभाजी ब्रिगेडकडून निषेध
“राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या विधानाचा आम्ही जाहीर निषेध करतो. ते सातत्याने अशी विधानं करत अशतात. शिवाजी महाराज हे जागतिक स्तरावरचे आदर्श नेते होते. शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही आणि कशाशीही होऊ शकत नाही”, अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे शिवानंद भानुसे यांनी दिली आहे.