महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसवर म्हणजेच एसटी बसेसवर राज्य सरकारच्या जाहिराती पाहायला मिळत आहेत. राज्यभर धावणाऱ्या या एसटी बसेसवर शिंदे-फडणवीस सरकारची जाहिरात झळकत आहे. ‘निर्णय वेगवान आणि महाराष्ट्र गतीमान’ अशा मथळ्याखाली ही जाहिरात राज्यभरात दिसतेय. टीव्हीवरील वेगवेगळ्या वाहिन्यांवर ही जाहिरात काही दिवसांपूर्वी पाहायला मिळत होती. या जाहिरातींवर राज्य सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी सातत्याने केला आहे. एकीकडे जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत, मात्र राज्यातल्या नागरिकांना सुविधा आणि विकास पाहायला मिळत नसल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोडखळीस आलेल्या किंवा दूरवस्था झालेल्या एसटी बसेसवरही ही जाहिरात चिकटवण्यात आली होती. अशा काही बसेसचे फोटो अलिकडे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका झाली होती. दरम्यान, आता आमदार रोहित पवार यांनीही एसटी महामंडळाच्या बसेसच्या दूरवस्थेवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

आमदार रोहित पवार यांनी एसटी महामंडळाच्या एका बसचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या बसचं छप्पर अर्धं निखळून उडत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. या व्हिडीओसह कॅप्शनमध्ये रोहित पवार यांनी लिहिलं आहे की, राज्य सरकारकडून एसटीचा केवळ जाहिरातबाजीसाठी वापर केला जात आहे.

हे ही वाचा >> “आम्ही आठ माळे चढू शकत नाही”, ‘त्या’ प्रश्नावर भरत गोगावलेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोल

रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, जेव्हा राजकारण मूलभूत मुद्द्यांवर वरचढ होतं, संस्थामध्येही राजकारणाचा शिरकाव होतो, तेव्हा विकास मात्र हरवतो. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. प्रवाशांना वेगवान सेवा देण्याऐवजी ‘निर्णय वेगवान आणि महाराष्ट्र गतीमान’ अशी केवळ जाहीरातबाजी करण्यापुरताच या सरकारकडून एसटीच्या बसेसचा वापर केला जात असल्याने मूलभूत प्रश्नांकडं मात्र दुर्लक्ष होत असल्याचंच या व्हिडीओवरून दिसत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar slams shinde fadnavis government for poor condition of msrtc buses asc
Show comments