राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. या पक्षात आता अजित पवारांचा एक आणि शरद पवारांचा एक असे दोन गट पडले आहेत. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पक्षातील आमदारांनी सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या गटातील आठ आमदारांनी मंत्रीपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता दोन्ही गट एकमेंकावर टीका करू लागले आहेत. शरद पवारांबरोबर असणारे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटातील आमदारांवर परखड शब्दांत सातत्याने टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी आज (७ जुलै) सकाळी केलेल्या ट्वीटमध्ये अजित पवारांबरोबर गेलेल्या सुनील तटकरे यांच्यावर टीकास्र सोडलं आहे.
रोहित पवारांनी आपल्या ट्वीटमध्ये सुनील तटकरे यांची कारकिर्द नमूद केली आहे. रोहित पवार यांनी तटकरे यांना उद्देशून म्हटलं आहे की, पक्ष संघटनेत आणि सत्तेतील असं एकही पद नाही जे तुम्हाला मिळालं नाही. तरीही अजून काय द्यायला पाहिजे होतं? छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असलेल्या रायगड जिल्ह्याचं आपण प्रतिनिधीत्त्व करत आहात.. महाराजांच्या एकाही मावळ्याने कधी फितुरी केली नाही… पण आपण…?
रोहित पवार यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, सुनील तटकरे साहेब रायगड जिल्हा नेहमीच आपल्या अधिपत्याखाली राहील याची काळजी शरद पवार यांनी घेतली. आमदारकी, खासदारकी, मंत्री अशी सर्वच पदं आपल्या एकट्याच्याच घरात दिली. अध्यक्षपदाची जबाबदारीही आपल्यावर सोपवली होती. पण ज्यांनी हे पद सांभाळलं त्यानेच इतरांच्या दावणीला हा पक्ष बांधावा का? असा प्रश्नही आपल्याला कसा पडला नाही? आमच्यासारख्या कार्यकर्त्याने तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा? तुम्हाला काय कमी केलं होतं? तुम्ही ही गुलामी का पत्करली? असे प्रश्नही रोहित पवार यांनी विचारले आहेत.
हे ही वाचा >> राष्ट्रवादीतून आणखीन ३ आमदार अजित पवार गटात येणार? कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांचा मोठा दावा!
रोहित पवार यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये शरद पवार यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुनील तटकरेंसाठी काय काय केलं आहे याचा लेखाजोखा मांडला आहे.
वडलांच्या निधनानंतर शरद पवार यांनी तुमच्यावर पित्यासमान प्रेम केलं.
१९९५ – माणगाव मतदारसंघातून काँग्रेसकडून आमदार
१९९९-२००४ – नगरविकास मंत्री
२००४-२००८ – अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री
२००८-२००९ – ऊर्जा मंत्री
२००९-२०१४ – जलसंपदामंत्री
२०१५-२०१८ – राष्ट्रवादी प्रदेश प्रदेशाध्यक्ष
२०१९-२०२२ – कन्या अदिती तटकरे आमदार तसेच उद्योग, क्रीडा आणि युवा कल्याण राज्यमंत्री.
२०१८ – मुलगा अनिकेत तटकरे विधानपरिषदेवर आमदार
हे सगळं वाचल्यावर लोकं म्हणतील की, असा अन्याय आमच्यावर पण व्हायला पाहिजे.