दसऱ्या मेळाव्यानंतर आता ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमावरून पुन्हा शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.

हेही वाचा – मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला; अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिंदे गटाला पाठिंबा देणार?

काय म्हणाले रोहित पवार?

“दसरा मेळाव्याच्या वेळीही शिंदे गटाने शिवाजी पार्क मैदानासाठी हट्ट धरला होता. त्यावेळी त्यांनी मोठ्या मनाने उद्धव ठाकरे यांना दसरा मेळावा घेऊ द्यायला हवा होता. मात्र, हे प्रकरण न्यायालयात गेलं. अंधेरी निडवणुकीच्या उमेदवारीवरूनही त्यांनी हाच प्रकार केला. अखेर न्यायालयाने ठाकरे गटाच्या बाजुने निकाल दिल्यानंतर ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. मात्र, आता दिवाळी पहाट कार्यक्रमासाठीही न्यायालयात जावं लागेल की काय, अशी परिस्थिती आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टीसाठी जर न्यायालयात जावं लागत असेल, तर जनता निडणुकीच्या माध्यमातून त्यांना उत्तर देईल. मोठ्या मनाचे लोक निवडून येतील आणि सारखं आडवाआडवीचे काम करणाऱ्यांचा पराभव होईल”, असा टोला रोहित पवार यांनी शिंदे सरकारला लगावला आहे.

हेही वाचा – Swords and Shield Symbol: शिंदे गटाच्या ‘ढाल-तलवार’ चिन्हाला शीख समाजाचा विरोध, निवडणूक आयोगाला पाठवलं पत्र

दरम्यान, राज्य सरकारने ८३० कोटींच्या प्रकल्पांना स्थगिती दिल्यावरूनही रोहित पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली. “राज्य सरकारने ज्या प्रकल्पांना स्थगिती दिली आहे. त्यापैकी बरेच प्रकल्प हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या मतदार संघातले आहे. यामध्ये रस्ते, शाळा, मंदिरे यासारख्या कामांचा समावेश आहे. या कामांसाठी जर हे पैसे खर्च झाले असते, तर सर्वसामान्यांची अनेक महत्त्वाची कामे पूर्ण झाली असती. त्यामुळे सरकारचा हा निर्णय योग्य नाही”, असेही ते म्हणाले.

Story img Loader