अजित पवारांसह काही आमदारांनी बंडखोरी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. उद्या (बुधवार, ५ जुलै) अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून बैठक बोलावण्यात आली आहे. अजित पवार गटाने मुंबईतील भुजबळ नॉलेज सिटी येथे बैठकीचं आयोजन केलं आहे. तर शरद पवार गटाकडून मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते, आजी-माजी आमदार-खासदार, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावं, असं आवाहन दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार गटाचे समर्थक रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार व अजित पवार एकत्र येण्यास अजूनही संधी आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते. दोन्ही गटाकडून आयोजित केलेल्या बैठकीवर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, “त्यांची (अजित पवार गट) बैठक भुजबळ सिटीला आहे. तर शरद पवारांनी वाय बी सेंटरला बैठक बोलावली आहे. म्हणजे बैठकीचं ठिकाण निवडतानाच किती मोठा फरक आहे, ते बघा. या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, ज्यांनी महाराष्ट्रासाठी खूप काही केलं आहे. त्यांच्या नावाने असलेल्या सभागृहात शरद पवार बैठक घेणार आहेत. तिथेच सर्व पदाधिकारी आणि आमदार-खासदार येतील.”
हेही वाचा- “…हे सगळं शरद पवारांनीच पेरलंय”, थेट कारण सांगत राज ठाकरेंचं मोठं विधान!
आमच्याकडे ४० पेक्षा अधिक आमदार आहेत, असा दावा अजित पवार गटाने केला आहे. तुम्ही आमदारांशी संपर्क केला आहे का? असा प्रश्न विचारला असता रोहित पवार म्हणाले, “सर्वच आमदार शरद पवारांना फोन करत आहेत. जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे हेही सर्व आमदारांच्या संपर्कात आहेत. तसेच अजित पवार आणि त्यांचे नेतेही आमदारांच्या संपर्कात आहेत. पण आज कोण-कुठे आहे? हे सांगता येणार नाही.”
हेही वाचा- “…ही तीन माणसं मला संशयास्पद वाटतात”, अजित पवारांच्या बंडखोरीवर राज ठाकरेंचं मोठं विधान
अजित पवार व शरद पवारांनी एकत्र राहिलं पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. यावर तुमचं मत काय? असं विचारलं असता रोहित पवार पुढे म्हणाले,”माझंही मत असंच आहे की, अजित पवारांनी शरद पवारांबरोबर राहायला हवं होतं. दोघं एकत्र येण्याची अजूनही संधी आहे. पण पुढे बघू काय होतंय ते. शेवटी जे काही होणार आहे, ते होणारच आहे. ते झाल्यानंतर शरद पवार जो निर्णय घेतील, तो निर्णय आम्हाला स्वीकारावा लागेल.”