केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लादलं आहे. केंद्राच्या या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. राज्यातले कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरून केंद्र सरकाविरोधात आंदोलन करत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांचा रोष पाहून सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा २,४१० रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, किमान ४ हजार रुपये प्रतिक्विंटल या दराने सरकारने कांदा खरेदी करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांच्या या मागणीला उत्तर देताना पवारांना टोला लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कांद्याच्या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (२२ ऑगस्ट) सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, “शरद पवार हे मोठे नेते आहेत. ते दहा वर्ष देशाचे कृषीमंत्री होते. त्यावेळीही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, संकटकाळात त्यांनी कांद्याबाबत असा निर्णय घेतला नाही. महाराष्ट्रातील शेतकरी संकटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या पाठिशी उभे राहिले. त्यामुळे यात कोणी राजकारण करू नये.”

एकनाथ शिंदे यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रोहित पवार यांनी एक ट्वीट केलं आहे. यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हटलं आहे की शरद पवार कृषीमंत्री असताना असा निर्णय झाला नाही, असं आपण म्हणालात, पण अजित पवारांबरोबर पत्रकार परिषदेत आपण हे वक्तव्य करण्याआधी शरद पवार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेतले होते, याची माहिती अजितदादांकडून घ्यायला हवी होती. ती घेतली असती तर कदाचित आपण हे वक्तव्य केलंच नसतं.

हे ही वाचा >> “…तर एकही जागा न मागता एनडीएला पाठिंबा देऊ”, बच्चू कडू यांचं वक्तव्य

आमदार रोहित पवार म्हणाले, शरद पवार यांनी असा निर्णय घेतला नाही, हे आपलं म्हणणं नक्कीच खरं आहे. कारण शरद पवारांनी आजच्या भाजपा सरकारप्रमाणे निर्यातशुल्क आकारून कांद्याचे भाव पाडले नाहीत. प्रसंगी शरद पवार हे तत्कालीन वाणिज्य मंत्र्यांशी भांडले आणि शेतकरी हिताचेच निर्णय घेतले. त्यामुळे आपण (एकनाथ शिंदे) उगाचंच राजकीय पतंगबाजी न केलेचीच बरी!