देशात मोठ्या प्रमाणात पेट्रोलवर दरवाढ होतं आहे. त्यामुळे विरोधक केंद्र सरकारवर टीका करत आहेत. काँग्रेसने राज्यभरात महागाईविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. दरम्यान भाजपाचे नेते पेट्रोल दरवाढीसाठी राज्य सरकारला जबाबदार धरत आहेत. या पार्श्वभूमीवर पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले १२ रुपये राज्यांना मिळतात, असे विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल (शुक्रवार) पुण्यात बोलतांना केली होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हे हास्यास्पद विधान असल्याचे रोहीत पवार म्हणाले.
“खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले १२ रुपये राज्यांना मिळतात असं हास्यास्पद विधान भाजपकडून पुण्यात करण्यात आलं. देशात इतर कुठंही ही चलाखी चालून गेली असती पण महाराष्ट्रात नाही,” अशी टीका आमदार रोहीत पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
यावर रोहीत पवार यांनी खोटं काय आणि वस्तुस्थिती सांगणारा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.
खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले १२ रुपये राज्यांना मिळतात असं हास्यास्पद विधान भाजपकडून पुण्यात करण्यात आलं. देशात इतर कुठंही ही चलाखी चालून गेली असती पण महाराष्ट्रात नाही. pic.twitter.com/Mj02RkRobt
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 10, 2021
केंद्र सरकारचे अपयश लपवण्याचा प्रयत्न
“केंद्र सरकार आकारत असलेल्या पेट्रोल वरील करात राज्याला किती पैसे मिळतात? तर केंद्र सरकार पेट्रोलवर आकारत असलेल्या ३२.९० रुपयांपैकी महाराष्ट्राला केवळ साडे तीन पैसे मिळतात. तरी केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी आपण मात्र राज्याला १२ रुपये मिळत असल्याचे सांगता.”, असा टोला रोहीत पवार यांनी फडणवीसांना लगावला आहे.
धडधडीत खोटं बोलणं कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही
रोहीत पवार म्हणाले, “विरोधकांना साडेतीन पैशाच्या ठिकाणी १२ रुपये दिसत असतील तर याला काय म्हणावं? सगळीकडं अधिवेशनातील बाराचाच आकडा दिसत असेल तर त्याला इलाज नाही. दिवसाढवळ्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असं धडधडीत खोटं बोलणं कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही.”
आज पुन्हा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर!
देशातील प्रमुख शहरांमध्ये वाढलेल्या किंमतींची आकडेवारी एएनआयनं दिलेली आहे. त्यानुसार, दिल्लीमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अनुक्रमे १००.९१ रुपये आणि ८९.८८ रुपये इतक्या झाल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत देखील पेट्रोल शंभरीपार असून प्रतिलिटर १०६ रुपये ९३ पैसे तर डिझेल प्रतिलिटर ९७ रुपये ४६ पैसे इतकी किंमत झाली आहे. दुसरीकडे कोलकात्यामध्ये हेच दर अनुक्रमे १०१.०१ रुपये आणि ९२.९७ रुपये तर भोपाळमध्ये ते १०९.२४ रुपये आणि ९८.६७ रुपये इतके नोंदवण्यात आले आहेत.
शहरनिहाय पेट्रोल-डिझेलच्या किंमती!
दिल्ली – पेट्रोल १००.९१ रुपये आणि डिझेल ८९.९८ रुपये प्रतिलिटर
मुंबई – पेट्रोल १०६.९२ रुपये आणि डिझेल ९७.४६ रुपये प्रतिलिटर
चेन्नई – पेट्रोल १०१.६७ रुपये आणि डिझेल ९४.३९ रुपये प्रतिलिटर
कोलकाता – पेट्रोल १०१.०१ रुपये आणि डिझेल ९२.९७ रुपये प्रतिलिटर
बंगळुरू – पेट्रोल १०४.२९ रुपये आणि डिझेल ९५.२६ रुपये प्रतिलिटर
लखनऊ – पेट्रोल ९८.०१ रुपये आणि डिझेल ९०.२७ रुपये प्रतिलिटर
पटना – पेट्रोल १०३.१८ रुपये आणि डिझेल ९५.४६ रुपये प्रतिलिटर
भोपाळ – पेट्रोल १०९.२४ रुपये आणि डिझेल ९८.६७ रुपये प्रतिलिटर