आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या बारामती आणि पुणे कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) शुक्रवारी छापे टाकले. या धाडीत ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रे जप्त केली आहेत. यावरून रोहित पवार यांनी भाजपा आणि अजित पवार गटाचा समाचार घेतला आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
रोहित पवार म्हणाले, “माझा आक्षेप ईडी कारवाईवर नाही. याआधीही ईडीला सहकार्य केलं आहे. भाजपा सरकार आल्यानंतर सीआयडी, राज्य उत्पादन शुल्क, आयकर विभागानेही कारवाई केली आहे. तपास यंत्रणांना सर्व कागदपत्रे दिली आहेत. माझा विषय मोठा असल्याचं भाजपाकडून दाखवण्यात येतंय. पण, तुमच्याकडे येण्यापूर्वी ज्या नेत्यांवर आरोप केले होते, त्यांच्यावरील कारवाईचं काय झालं? त्यांनी केलेल्या चुकांचं काय झालं?”
“हातोडा घेऊन कुठे कुठे गेला होता, त्याचं काय झालं?”
“मी व्यवसायात आधी होतो, नंतर राजकारणात आलो. जे लोक आधी राजकारणात होते आणि नंतर मोठे व्यवसायिक झाले, त्यांच्यावरील कारवाईचं काय करणार आहात? हातोडा घेऊन कुठे कुठे गेला होता, त्याचं काय झालं?” असा सवाल उपस्थित करत रोहित पवारांनी भाजपा नेते, किरीट सोमय्यांना लक्ष्य केलं.
“कुठलाही आर्थिक गैरव्यवहार झाला नाही”
‘घर भेदीमुळे रोहित पवारांवर कारवाई झाली’ असं वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. याबद्दल प्रश्न विचारल्यावर रोहित पवारांनी म्हटलं, “गेल्या सात दिवसांत भाजपा आणि अजित पवार गटातील कोण कोण दिल्लीला गेलं, याच्या प्रवासाची माहिती घ्या. कुठलाही आर्थिक गैरव्यवहार झाला नाही. सर्व कागदपत्रे तपास यंत्रणांना दिली आहेत.”
“आमच्यासाठी विचार, महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राची अस्मिता महत्वाची”
“सत्तेतील मोठ्यानं आवाजात बोलणाऱ्या नेत्यांना एवढंच सांगणं आहे की, मी विदेशात होतो. मी चूक केली असती, तर भारतात आलोच नसतो. दुसरं की खरी चूक केली असती, तर अजित पवारांबरोबर भाजपासोबत गेलो असतो. मात्र, आमच्यासाठी विचार, महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राची अस्मिता महत्वाची आहे. ईडी आणि अन्य तपास यंत्रणांना सहकार्य करत राहू,” असं रोहित पवारांनी सांगितलं.