राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पाटील यांनी कर्जत-जामखेडमध्ये मतदारसंघ मिसळ खातानाचे फोटो ट्वीट करत जोरदार टोलेबाजी केली. एकाच मिसळमध्ये पोट भरल्याने ३५ मिसळ खाण्याच्या केवळ कल्पनेनेच कसंतरी झाल्याचं म्हणत रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शाब्दिक चिमटा काढला. तसेच मिसळ खाल्ल्यानंतर पैसे न देताच उठून गेलो नाही, तर नेहमीप्रमाणे बिलही पेड केल्याचं सांगत भाजपाला ठाण्यातील वडापाव बिलच्या व्हायरल व्हिडीओवरून टोला लगावला.
रोहित पवार म्हणाले, “मतदारसंघात असताना भूक लागल्याने मीही जळगावमधील राहुल हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत मिसळ खाल्ली. एकाच मिसळमध्ये पोट भरल्याने ‘३५’ मिसळ खाण्याच्या केवळ कल्पनेनेच कसंतरी झालं आणि हो मिसळ खाल्ल्यानंतर पैसे न देताच उठून गेलो नाही, तर नेहमीप्रमाणे बिलही पेड केलं.”
३५ या अंकाचा विशेष उल्लेख करत राहित पवारांकडून फडणवीसांना चिमटा
रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये ३५ या अंकाचा विशेष उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला आहे. याआधी अमृता फडणवीस यांनी एका शोमध्ये देवेंद्र फडणवीस एका बैठकीत किती पुरणपोळ्या खाऊ शकतात? या प्रश्नाचं उत्तर देताना ते ३०-३५ पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे असे म्हटले होते. त्यापोठापाठ लग्नानंतर तुमची अपूर्ण राहिलेली इच्छा कोणती? हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अमृता यांनी ३०-३५ पुरणपोळ्या खाताना पाहण्याची, त्याही मी न बनवलेल्या असे सांगितले.
बिल न भरण्याचा टोमणा कुणाला?
ठाण्यात भाजपा नेत्यांचा असाच व्हिडीओ कौतुकाचा विषय होण्याऐवजी टीकेचा विषय ठरला होता. ठाणे स्टेशनबाहेरील गजानन वडापाव सेंटरमधील या व्हिडीओत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, भाजप नेते विनय सहस्त्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते वडापाववर ताव मारताना दिसले. मात्र, हे सर्व नेते आणि कार्यकर्ते तब्बल २०० वडापाव खाऊन पैसे न देताच निघून गेल्याचा आरोप झाला होता. यानंतर भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी हॉटेल मालकाला पैसे अदा करत या वादावर पडदा टाकला होता.
रावसाहेब दानवेंसह अनेक दिग्गज नेते या व्हिडीओत दिसत असल्याने वडापाव खातानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत राहिला होता. त्यातच बिल न दिल्याचा आरोप झाल्याने विरोधकांनी भाजपावर सडकून टीका केली होती. जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगरमधील एका कार्यक्रमात बोलताना फुकट वडापाव खाणाऱ्यांची तुमचं शहर सांभाळण्याची औकात नाही, असं म्हणत भाजप मंत्र्यांवर अप्रत्यक्ष टोला लगावला होता.