निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ गोठवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर ‘शिवसेना’ हे नावही आयोगाकडून गोठवण्यात आले आहे. तसेच शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक गटाला येत्या निवडणुकीत दोन वेगळी चिन्हे दिली जाणार आहेत. दरम्यान, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय; शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, अनिल परब म्हणाले…
काय म्हणाले रोहित पवार?
“शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निवडणूक आयोगाचा निकाल लोकांसाठी धक्कादायक असला तरी अनपेक्षित मात्र नक्कीच नाही. चिन्ह गोठवलं म्हणजे आपले मनसुबे साध्य होतील, असा त्रयस्थांचा अंदाज असला तरी लोकांच्या मनातली निष्ठा मात्र गोठवता येणार नाही”, असे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे.
“दसरा मेळाव्यात दिसलेली निष्ठा निवडणुकांमध्येही निश्चित दिसेल. धनुष्यबाणाचं चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठल्याने खऱ्या शिवसैनिकाला अत्यंत वेदना होत असणार, हे मात्र खरं आहे. पण ज्यांना त्रास होत नसेल त्यांनी दुसऱ्यांची स्क्रिप्ट स्वीकारली असंच म्हणावं लागेल”, असेही ते म्हणाले.